‘कमी-जास्त वयाचे कारण देऊन शाळांनी मुलांचे प्रवेश नाकारू नयेत’

शिक्षण संचालकांचे आदेश

पुणे – राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी मुलांच्या प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे. त्यामुळे शाळांनी कमी-जास्त वयाचे कारण देऊन प्रवेश नाकारू नयेत, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी काढले.

शाळा प्रवेशासाठी मुलांचे किमान वय निश्‍चित करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 18 सप्टेंबर 2020 रोजी निर्णय जाहीर केला. त्या अनुषंगाने काही पालकांनी शासनाकडे निवेदने पाठविली. संबंधित शासन निर्णय हा शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून लागू करण्याऐवजी 2022-23 पासून लागू करण्याची मागणी होत आहे.

किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. पालकांची इच्छा असल्यास 3.5 ते 4.5 वय असणारी मुले ज्युनियर केजी (एलकेजी) मध्ये प्रवेश घेऊ शकतात. शासन निर्णय मुख्यत: इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी लागू राहणार आहे. डिसेंबर 2020 मध्ये वयाची 6 वर्षे पूर्ण होणाऱ्या बालकास 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीमध्ये प्रवेश घेता येणार आहे, असे स्पष्ट केले आहे.

बऱ्याच शाळा 2021-22 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया डिसेंबर 2020 मध्ये सुरू करतात. मात्र, काही शासन निर्णयापूर्वीच तत्कालीन नियमाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली असल्यास त्यांना 2022-23 पासून शासन निर्णय लागू होणार आहे. ज्या शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली नाही त्यांना शासन निर्णयाप्रमाणेच कार्यवाही करावी लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.