पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आठ सहायक पोलीस आयुक्तांची पदे मंजूर आहेत. मात्र आणखी एक म्हणजे नवव्या सहायक पोलीस आयुक्तांची बदली शहरात झाल्याने मंजूर पदापेक्षा एक जादा अधिकारी मिळाला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून सतीश पाटील, गणपत माडगूळकर, चंद्रकांत आलसटवार, श्रीकांत मोहिते आणि निलिमा जाधव हे निवृत्त झाले. त्यांच्याजागी आर. आर. पाटील आणि संजय नाईक पाटील हे दोन नवीन सहायक आयुक्त मिळाले. अश्विनी राख या दीर्घकालीन रजेवर गेल्याने सहायक आयुक्तांची तीन पदे रिक्तच होती. त्यातरच श्रीधर जाधव, अश्विनी राख आणि राम जाधव यांची बदली करण्यात आली. त्यांच्याजागी नंदकुमार पिंजण आणि नंदकिशोर भोसले पाटील हे दोन सहायक आयुक्त शहराला लाभले.
राम जाधव यांच्या निवृत्तीला अवघा आठ महिन्यांचा काळ शिल्लक असल्याने ते मॅटमध्ये गेले. मॅटने त्यांची बदली रद्द केल्याने ते पुन्हा शहरात कायम राहिले.तर आता नव्याने डॉ. सागर कवडे, गणेश बिरादार आणि श्रीकांत डिसले हे अधिकारी मिळाल्याने मंजूर पदापेक्षा एक जादा सहायक आयुक्त शहराला मिळाले आहेत.
राज्य शासनाच्या गृह मंत्रालयाने याबाबतचे आदेश दिले आहेत. गृह विभागाने बुधवारी (दि. 14) राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक आयुक्त दर्जाच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांची पिंपरी-चिंचवड शहरात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. श्रीकांत डिसले यापूर्वी पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते.
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्यांना बदलीचे ठिकाण देण्यात आले नव्हते. त्याबाबत स्वतंत्र आदेश काढणार असल्याचे गृह विभागाकडून सांगण्यात आले होते. गृह विभागाने बुधवारी त्याबाबत स्वतंत्र आदेश काढून तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.