पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील 9 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा व महाविद्यालय 4 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. काही मार्गदर्शक सूचना आणि अटींना अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे.
राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. त्याला अनुसरून शाळा, महाविद्यालयांमधील नववी ते बारावीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 17 ते 22 नोव्हेंबर 2020 या कालावधीत कोवीड-19 आजाराबाबत चाचणी करण्याविषयी महापालिकेला मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या होत्या. शाळा सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचना व अटींची पूर्तता करण्याबाबत शाळा व महाविद्यालयांना सांगितले होते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोवीड-19 साठी आरटी-पीसीआर, रॅपिड अँटीजेन चाचणी करून घेणे, विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरून घेणे, शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण, तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, डिजिटल थर्मामीटर, हात धुण्याची व्यवस्था, सोशल डिस्टंसिंग प्लॅन आदी बाबींचा पुर्तता त्यामध्ये समावेश होता. कोवीडची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरामध्ये 3 जानेवारीपर्यंत नववी ते बारावीपर्यंतचे सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदत संपत असल्याने आता 4 जानेवारीपासून महापालिका क्षेत्रातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले जाणार आहे.
मार्गदर्शक सूचना व अटींवर परवानगी
नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 10 नोव्हेंबर 2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व अटींचे पालन करणे शाळा, महाविद्यालय व्यवस्थापनावर बंधनकारक राहील. शाळेमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरणविषयक सुविधा करण्यासाठी थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, गन, पल्स ऑक्झिमिटर, जंतुनाशक, साबण, पाणी आदी आवश्यक वस्तूंची उपलब्धता असल्याबाबत दक्षता घेण्यात यावी. शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण नियमित होत असल्याबाबत व याबाबत उपाययोजना केली आहे किंवा नाही याची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करणे आवश्यक राहील.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कोवीड-19 साठीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळेत दफ्तरी ठेवण्यात यावे. वर्गखोली तसेच स्टाफरूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या (फिजिकल डिस्टन्स) नियमानुसार असावी. शाळेमध्ये दर्शनी भागावर फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर आदीसंदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे पोस्टर, स्टिकर, शाळेत अंतर्गत व बाह्य परिसरात रांगेत उभे राहण्यासाठी किमान 6 फुट इतके शारिरीक अंतर राखले जाईल यासाठी विशिष्ट चिन्ह लावणे, शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्याचा व जाण्याचा मार्ग बाणाच्या खुणांद्वारे वेगवेगळा निश्चित करणे आदी व्यवस्था शाळांना करावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळाप्रमुखांनी प्राप्त करून घ्यावी. शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जातो का? स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण केले जाते का, याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करून घेणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा (विद्यार्थी वाहनात बसल्यानंतर व उतरल्यानंतर) निर्जंतुकीकरण केले जाते का? याची खातरजमा शाळा व्यवस्थापनाने करून घ्यावी, असे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.