गोठ्यात भरायची शाळा; स्वखर्चातून बांधून दिली शाळेची इमारत

सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब खाडे यांचा स्तुत्य उपक्रम

जामखेड (प्रतिनिधी) : शाळेची इमारत धोकादायक बनल्याने तालुक्यातील सतेवाडी या गावातील शाळा मागील वर्षभरापासून गोठ्यात भरवली जात होती. विद्यार्थ्यांचे हे हाल पाहून शेजारील डोळेवाडी गावचे सुपुत्र व मुंबईमधील युवा उद्योजक काकासाहेब खाडे यांना विद्यार्थ्यांची दया आली व त्यांनी स्वखर्चातून सतेवाडीसाठी शाळा बांधून देण्याचा निर्णय घेतला. याच इमारतीच्या बांधकामाचे आज पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी काकासाहेब खाडे, भास्कर तोंडे, उत्तम सानप आदी गावकरी उपस्थित होते.

Related Posts

सतेवाडी येथील शाळेची इमारत धोकादायक यादीत पडल्यानंतर शाळा कुठे भारवायची असा प्रश्न शिक्षक व प्रशासनाला पडला होता. मात्र या समस्येवर उपाय न निघाल्याने त्यांनी वस्तीवरील एका गोठ्यात भरवण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस ही शाळा गोठ्यात भरवली जायची कालांतराने गावातच बालवाडी इमारतीचे काम पूर्ण झाल्याने चौथी पर्यंतची शाळा बालवाडीत भरवली जाऊ लागली. दोन दिवसांपूर्वी काकासाहेब वस्तीवर काही कामानिमित्त आल्यानंतर विद्यार्थ्यांची व शिक्षकांची अडचण लक्षात आली. त्याच वेळी त्यांनी शिक्षक व गावकऱ्यांशी चर्चा करून शाळेची इमारत मी स्वखर्चातून बांधून देण्याचे आश्वासन दिले.

यानंतर शाळेसाठी जमीनीचा प्रश्न उभा राहिला व भास्कर तोंडे व त्यांचे चिरंजीव केशव तोंडे यांनी देखील शाळेसाठी त्यांची जमीन देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर दोनच दिवसात काकासाहेबांनी शाळेचे काम सुरू करण्याची सूचना दिली. यासाठीचे सर्व साहित्य त्यांनी स्वखर्चातून खरदी करून शिक्षक व गावकऱ्यांच्या ताब्यात दिले.

अखेर आज युवा नेते रोहित पवार यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पवार यांनी काकासाहेबांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत गावाचा विकास करायचा असेल तर काकासाहेबांसारख्या तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. उपस्थित गावकरी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी काकासाहेब खाडे यांचे आभार मानले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.