डिंभे -नारोडी (ता. आंबेगाव) खडकमळा (गणेशनगर) येथील गृहस्थ बबन कोंडाजी पिंगळे हे आपल्या राहत्या घराच्या ओट्यावर नेहमीप्रमाणे झोपले असता पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना घरामागे सुमारे 100 मीटरपर्यंत ओढत नेले त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांना जाग आल्याने पुढील अनर्थ टळला.
याबरोबरच भगवान अल्हाट यांच्या नारोडी गावातील घरापाशी बांधलेल्या शेळीवरही पहाटेच्यावेळी बिबट्याने हल्ला केला होता. त्या आधी चाफमळा येथे राहत असलेल्या एकनाथ नाईक यांच्या घरापाशी 2 पाळीव कुत्र्यांवर हल्ला झाला असून, किसन नाईक यांच्या शेतात ऊसतोडीचे काम चालू असताना ऊसतोड कामगारांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे नारोडी परिसरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिक दिवसाढवळ्या बाहेर येण्यास घाबरत आहे.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली आहे. वन विभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी महाजन यांच्याशी संपर्क साधला असता या परिसरातील बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
हा परिसर बिबट्याप्रवण असल्याने नागरिकांनीही सावधानता बाळगणे गरजेचे असून, ऊसतोड करताना मजुरांनी काळजी घ्यावी, तसेच रात्रीच्या वेळी बाहेर न पडता घरातच झोपण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.