समभाग खरेदीसाठी 26 लाखांचा निधी ः आढळराव पाटील यांची माहिती
ओतूर-जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु करण्याच्या पहिल्या प्रयत्नाला यश आले असून श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा उत्पादक सहकारी संस्थेस समभाग खरेदीसाठी 26.60 लाख रुपये निधीला राज्याच्या आदिवासी विभागाने मंजुरी दिल्याची माहिती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक संस्थेचे अध्यक्ष काळू शेळकंदे व आदिवासी नेते मारुती वायाळ यांनी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची भेट घेऊन खानापूर, (ता. जुन्नर) येथील बंद अवस्थेत असलेला हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आढळराव पाटील व सोनवणे यांनी मंत्रालयात यासंदर्भात आदिवासी मंत्री अशोक उईके व प्रधान सचिवांची भेट घेऊन या प्रकल्पाची माहिती देत या प्रकल्पामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळ भागातील आदिवासी भागाला या प्रकल्पाची होणारी उपयुक्तता निदर्शनास आणून दिली. त्यानुसार हा उद्योग सुरु करण्याच्या पहिल्या प्रयत्नाला यश मिळाले. याबाबत राज्य शासनाचे आदिवासी विभागाचे मंजुरीपत्र 11 सप्टेंबर रोजीचे पत्र जिल्हाधिकारी पुणे व आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी घोडेगाव यांना कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.
आढळराव पाटील म्हणाले, आदिवासी भागातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी स्वतः व जुन्नरचे आमदार शरद सोनावणे आम्ही कटिबद्ध आहोत. यासंदर्भात माझी नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरु असून याकरिता सुमारे 18 कोटी 24 लाख निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. यापैकी हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी 2 कोटींची तरतूद आवश्यक आहे. तर भविष्यातील आदिवासी समाजाला मिळणारे फायदे लक्षात घेऊन हिरड्या व्यतिरिक्त जांभूळ, आंबा, करवंदे आदींवरील प्रक्रियांकरिता 50 टन क्षमतेचे शीतगृह उभारणे, बाळ हिरडा गोळ्यांचा प्रकल्प उभारणे यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे.