पुणे – गतवर्षी घरच्या गणपतीची सजावट म्हणून केलेल्या पुणे मेट्रो प्रतिकृती देखाव्याचे सर्व स्तरातून कौतुक झाले. या प्रोत्साहनामुळे यावर्षी गणपती सजावट म्हणून महाराष्ट्र सरकारचा स्वप्नवत आणि बहुचर्चित प्रकल्प असलेला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे गावाजवळील सिन्नर-नाशिक इंटरचेंजचा हुबेहूब प्रतिकृतीचा देखावा केला आहे.
येरवडा, प्रतिकनगर येथील ऍड. सम्राट रावते यांच्या घरात हा देखावा करण्यात आला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी ऍड. सम्राट रावते, पंकज बारभुवन, किर्ती बिजगर्णी, आसावरी पाटील, श्रीराम काटकर, ओम देवकर, हर्षद कदम, तन्वी सुर्यवंशी, रिया सूर्यवंशी, आद्या बिजगर्णी, हृषित वाघमारे, प्रणव नेसवणकर आणि मीत महाजन यांनी मोलाचे योगदान दिले आहे. यामध्ये मुंबई-नागपूर आणि नागपूर-मुंबई असा मुख्य समृद्धी महामार्ग सोबत सिन्नर इंटरचेंज वरील चार निकस मार्ग आणि चार प्रवेश मार्ग असे एकूण 8 साईड रोड साकारले आहेत.
तसेच, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा टार रोड साकारला आहे. इंटरचेंज वरील एकूण 8 निकस आणि प्रवेश मार्गावर 8 टोल नाके दाखवले असून त्यावर एकूण 120 दिव्यांचे खांब देखील आहेत. समृद्धी महामार्ग जमिनीपासून वर उचलला असून दोन्ही बाजूस शेती व डोंगर दाखवले आहेत. संपूर्ण महामार्गवर दिशा दर्शक बोर्ड दाखवले आहेत. शिवनेरी, शिवशाही, लालपरी बस, ट्रक, कार इ. तयार करून महामार्गावर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामार्गाच्या अजून शोभा वाढते. तसे प्रकल्पाची माहिती आणि रोड सुरक्षा दर्शक माहिती देखाव्याचा भाग आहे.
हा देखावा करण्यामागे हेतू आणि संदेश हा आहे की, ज्या प्रकारे या महामार्गाबद्दल लोकांच्या मनात अपघाताची भीती निर्माण झाली आहे. ती कमी करण्याचा एक प्रयत्न करत आहोत. कारण सदर महामार्ग अत्यंत उकृष्ट पद्धतीने बनवला गेला असून त्यावर जर सर्व प्रकारची काळजी घेऊन आणि काटेकोरपणे नियमाचे पालन करून जर प्रवास केला. तर, कोणत्याही प्रकारे रोड अपघात न होता सर्वांचा प्रवास सुखाचा आणि कमी वेळेत होईल आणि या महामार्गा तयार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे. त्यांच्या कष्टाचे चीज होईल. तसेच हा उकृष्ट महामार्ग बनवण्यात योगदान दिलेल्या सर्व प्रकल्प प्रमुख, इंजिनिअर, अधिकारी, कामगार वर्ग या सर्वांचे कौतुक आणि त्यांच्या कष्टाला सलाम करण्यासाठी हा देखावा केला आहे.