पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विक्रम गोखले यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने अध्यासन सुरु करुन, त्यांच्या अभिनयाच्या वारसाचे जतन केले जाईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे तंत्र आणि उच्चशिक्षण मंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड आणि आम्ही कोथरुडकर यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरनाद योग केंद्र येथे विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी केलेल्या अपेक्षेवर पाटील यांनी ही घोषणा केली.
पाटील म्हणाले, “विद्या ही आपल्या जवळ ठेवून नव्हे तर ती जास्तीत जास्त वाटून वाढवता येते, या भावनेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थांसाठी विक्रम गोखले यांनी पुस्तकरुपी जो खजिना सुपूर्द केला आहे, त्याचे संवर्धन जतन करू. गोखले यांच्या तीन पिढ्यांना मिळालेल्या पारितोषिकांचे दालन निर्माण करण्यासाठी ज्या ट्रॅफीज सुपूर्द केल्या आहेत, ते दालन लवकरात लवकर उभे राहण्यासाठी, प्रकल्पाला गती मिळण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगी देत आहोत.’ या श्रद्धांजली सभेत संदीप खर्डेकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, ऍड. मंदार जोशी, गायक त्यागराज खाडिलकर, पूना गेस्ट हाऊसेचे किशोर सरपोतदार, राजेश दामले, मिलिंद कुलकर्णी, विजय फळणीकर, राज काझी, आनंद दवे आदींनी गोखले यांच्याविषयींच्या आठवणींना उजाळा दिला. नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर आणि ऍड. अर्चिता मंदार जोशी यांच्या विशेष प्रयत्नांतून ही श्रद्धांजली सभा आयोजित केली होती.
विक्रम गोखले नावाचा ऑरा ते कधी मिरवत नसत. घरी देखील सर्वसामान्य व्यक्तीसारखाच त्याचा सहज वावर असायचा. पीठलं-भाकरी आणि खर्डा त्याला खूप आवडायचा. अभिनयरुपी विद्या इतरांना वाटत राहण्यावर त्याचा प्रचंड भर होता. – वृषाली गोखले, विक्रम गोखले यांच्या पत्नी