पुणे-प्रादेशिक परिवहन विभागाचा बनावट शिक्का आणि अधिकाऱ्याची सही करून रिक्षांन मीटर पुनःप्रमाणीकरण(कॅलिब्रेशन) प्रमाणपत्र दिल्याचे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या आळंदीरोड, फुलेनगर येथे उघड झाले. दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अशा प्रकारे प्रमाणपत्र देणाऱ्यांचे मोठे रॅकेट तर नाही ना? याचा तपास पोलीस करत आहेत.
फुलेनगर चाचणी मैदान येथे दि. 2 डिसेंबर रोजी ऑटोरिक्षाचे मीटर आणि कागदपत्रे तपासणीवेळी आरटीओ निरीक्षक तनुजा डोके यांना ऑटोरिक्षा चालकाने मीटर कॅलिब्रेशन प्रमाणपत्र दिले. त्यावेळी डोके यांना तेथील सही त्यांची नसल्याचे व त्यावरील शिक्क्याबाबत संशय आला. दि. 5 डिसेंबर रोजी पुन्हा मीटर तपासणीवेळी रिक्षाचालक अभिजीत बंडबे, माऊली जगताप, शंकर उगले व राम कुंभार यांच्याकडील प्रमाणपत्र तपासले असता, ते देखील बनावट शिक्का व बनावट सही करून तसेच बनावट नोंदणी क्रमांक टाकून प्रमाणपत्र चालक वापरत असल्याचे दिसून आले. त्यावेळी डोके यांनी विचारपूस केली असता त्यांनी सदर प्रमाणपत्र हे पराग मोतीवाले व नजीर सय्यद यांनी बनवून दिल्याचे सांगितले. रिक्षाचालकांपैकी एकाने पराग यास बोलावून घेतले. मोतीवाले आला, तेव्हा चौकशीत तो मीटर कॅलिब्रेशन प्रमाणपत्र आणत व त्यावर नजीर सय्यद हा शिक्का आणि बनावट सही करत असल्याचे त्याने सांगितले. नजीर सय्यद याने त्या प्रमाणपत्रावर माझ्या नावाची बनावट सही करून बनावट शिक्के मारल्याचे सांगून प्रमाणपत्रासाठी पराग मोतीवाले हा रिक्षाचालकाकडून 300 रुपये घेत असल्याचे सांगितले. अशी बरीच प्रमाणपत्रे आतापर्यंत दिल्याचे समोर आले आहे.
असे होते प्रमाणीकरण
आरटीओ निरीक्षक कॅलिब्रेशन प्रमाणपत्रावर रिक्षाचा नंबर, मीटर नंबर असतो. ही रिक्षा दीड किलोमीटर ट्रॅकवर चालविण्यास चालकास सांगितले जाते. यानंतर 1.5 किलोमीटरला 25 रुपये, 1.6 कि.मी.ला 27/- रुपये असे मीटरला दिसल्यानंतर प्रमाणपत्रावर आरटीओ निरीक्षकाच्या नावाचा शिक्का व सही करून रजिस्टरला नोंद करतात. ऑटोरिक्षाचा मीटर सील केल्यानंतर मीटर कॅलिब्रेशन तपासणी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.