चीनची लस घेतल्यास सौदी अरबमध्ये ‘नो एन्ट्री’

इस्लामाबाद : चीनच्या लसीवरुन पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. आता सौदी अरबने देखील चीनची लस घेणाऱ्यांना प्रवेश बंद केलाय. चीनची कोरोना लस सिनोफार्म आणि सिनोव्हॅकला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली असली तरी या देशांनी त्यावर बंदी घातलीय. सौदी अरबसह अनेक देशांनी चीनच्या लसींवर अविश्वास दाखवला आहे. म्हणूनच त्या लसी घेणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानमधील अनेक लोक सौदी अरबमध्ये काम करतात. अशातच सौदी अरबने ही बंदी घातल्याने पाकिस्तानच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झालीय. पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी सांगितलं होतं की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्वतः या विषयात व्यक्तिगत लक्ष घालच आहेत.

सौदी अरबसह आणखी काही मध्य-पूर्वमधील देशही चीनच्या लसीला मान्यता देत नाहीयेत. डॉन वृत्तपत्रानुसार, सौदी अरबमध्ये केवळ फायझर, एस्ट्राजेनेका, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसींना मान्यता आहे.

सौदी अरबच्या या निर्णयाने पाकिस्तानची चांगलीच काळजी वाढलीय. याचा परिणाम शेख रशीद यांच्या पत्रकार परिषदेतही पाहायला मिळाला. ते म्हणाले, “पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाला दिलेल्या माहितीनुसार चीनच्या लसीच्या मुद्द्यावर ते सौदीसह इतर देशांच्या संपर्कात आहेत. सिनोफार्म एक चांगली लस आहे. चीनने पाकिस्तानला मदत केली त्यासाठी त्यांचे धन्यवाद.”

सध्या सौदी आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे चीनची लस घेऊन पाकिस्तानच्या नागरिकांना प्रवेश मिळणार नाही हे निश्चित आहे. चीनच्या लसीबाबत अनेकांना विश्वास आलेला नाही. म्हणूनच अखेर पाकिस्तानला बाहेर देशात जाणाऱ्या आपल्या नागरिकांना फायजर लस पुरवण्याचा निर्णय घ्यावा लागलाय.

यानुसार कामासाठी, शिक्षणासाठी किंवा हजसाठी बाहेर जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना इम्रान खान सरकार फायजर लस देणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.