अग्रलेख | समाज माध्यमांचा असाही बळी

इंग्लंड क्रिकेट संघातील उदयोन्मुख गोलंदाज ओली रॉबिन्सन याला त्याने आठ-दहा वर्षांपूर्वी केलेल्या समाज माध्यमातील वक्‍तव्यावरून संघातून निलंबित करण्यात आल्याची घटना म्हणजे आधुनिक काळातील समाज माध्यमांनी घेतलेला एक नवीन बळी मानावा लागणार आहे. ट्‌विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सऍपसारख्या समाज माध्यमांचा लीलया वापर करण्याची सवय असणाऱ्या आधुनिक पिढीला या माध्यमांचा वापर कसा जागरूकपणे करायला हवा, याचा धडा या घटनेतून निश्‍चितपणे मिळायला हवा. 

विविध समाज माध्यमांमध्ये पसरलेल्या अफवा आणि चुकीचे संदेश यामुळे देशात आणि परदेशातही काही ठिकाणी दंगली भडकल्याच्या घटना पण आहेत. अशा प्रकारच्या दंगलींमध्ये अनेक लोकांचा बळी गेला आहे, पण वयाच्या अठराव्या वर्षी समाज माध्यमांवर जे मत रॉबिन्सनने व्यक्‍त केले होते त्याचा फटका त्याला नऊ वर्षांनी म्हणजे वयाच्या 27 व्या वर्षी बसेल आणि ज्या दिवशी त्याची क्रिकेट कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू होणार होती त्याच दिवशी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम मिळेल, हे कोणालाही वाटले नसेल. वयाच्या अठराव्या वर्षी ओली रॉबिन्सनने काही वर्णभेदी आणि लिंगभेद विषयाची ट्‌विट्‌स केली होती. त्यावेळीही त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला होता तेव्हा त्याने त्याबद्दल माफी मागून ती ट्‌विट्‌स मागे घेण्याचा प्रयत्न केला होता. नऊ वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यांमध्ये जेव्हा त्याचा इंग्लंडच्या क्रिकेट संघात समावेश झाला तेव्हा या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ती जुनी ट्‌विट्‌स पुन्हा समाज माध्यमांवर प्रदर्शित झाली आणि नव्याने गदारोळ झाल्याने अखेर इंग्लिश क्रिकेट बोर्डाला रॉबिन्सनवर कारवाई करून निलंबित करावे लागले. 

पूर्वी केलेल्या चुकीचे पुरावे पुन्हा एकदा अशा प्रकारे समाज माध्यमांवर कसे प्रदर्शित होतात हा संशोधनाचा विषय असला तरी नकळत्या वयात केलेल्या चुकांचा तोटा नंतरच्या काळातही होतो, हा धडा मात्र या घटनेने निश्‍चितच दिला आहे आणि समाज माध्यमांचा वापर किती सजगपणे आणि जागरूकपणे करायला हवा हेसुद्धा या घटनेने दाखवून दिले आहे. इंग्लिश बोर्डाने रॉबिन्सनवर केलेली कारवाई खूपच कडक आहे, अशा प्रकारची मते व्यक्‍त होत असली तरी सध्याच्या परिस्थितीत इंग्लिश क्रिकेट व्यवस्थापनासमोर दुसरा अन्य पर्याय नाही, हेही मान्य करावे लागेल. वयाच्या अठराव्या वर्षी जी आक्षेपार्ह आणि चुकीची विधाने त्याने केली होती, ती नकळत्या वयात आणि अनावधानाने केली होती, असा युक्‍तिवाद जरी करण्यात येत असला तरी अजूनही रॉबिन्सनच्या मनात त्याच भावना नसतील, अशी कोणतीही हमी देता येत नाही. 

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक क्रिकेटमध्ये इंग्लंड क्रिकेट संघ सर्वात जास्त इतर वंशातील खेळाडू आणि इतर देशांतील खेळाडू यांना सामावून घेतो. आज इंग्लंडच्या क्रिकेट संघामध्ये अनेक कृष्णवर्णीय खेळाडू आहेत. त्याशिवाय इतर देशांतून इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारून इंग्लंडच्या संघाकडून खेळणारेही अनेक खेळाडू आहेत. कृष्णवर्णीय खेळाडू आणि कृष्णवर्णीय नागरिकांबाबत ट्‌विटरवर टिप्पणी केली आहे तो रॉबिन्सन इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून खेळताना जोफ्रा आर्चर सारख्या कृष्णवर्णीय क्रिकेटपटूसोबत कसं काय जुळवून घेऊ शकतो, हा विषयही या निमित्ताने समोर येऊ शकतो. जोफ्रा आर्चरसारख्या अनेक कृष्णवर्णीय खेळाडूंच्या मनात रॉबिन्सनसारख्या गौरवर्णीय खेळाडूंबाबत काय भावना असतील याचाही विचार या निमित्ताने करायला हवा. वरवर पाहता रॉबिन्सनवर करण्यात आलेली कारवाई खूपच कडक वाटत असली, तरी अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आणि युवा क्रिकेटपटूंना योग्य धडा मिळावा म्हणून ही कारवाई योग्यच मानायला हवी.

भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन याने या प्रकरणावर व्यक्‍त केलेली मते अत्यंत महत्त्वाची मानावी लागतील. सोशल मीडियावर तुम्ही व्यक्‍त केलेली मते कधीच नष्ट होत नाहीत. ती कधी पुढे येऊन तुम्हाला छळतील हे सांगता येत नाही. त्यामुळे ही माध्यमे वापरताना काळजी घ्यायलाच हवी, असे अश्‍विनने म्हटले आहे आणि हा संदेश केवळ खेळाडूंसाठी नाही तर समाजातील सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानावा लागेल. एखाद्या खेळाडूचे किंवा व्यक्‍तीचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी त्याने पूर्वी समाज माध्यमांवर व्यक्‍त केलेली मते अशा प्रकारे जर नको त्या वेळी समोर आणण्यात येत असतील तर समाज माध्यम हे एक शस्त्र म्हणून समोर आले आहे की काय, अशी शंका येते. 

आतापर्यंत राजकीय नेत्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेल्या उलटसुलट मतांचा वापर अशा प्रकारे अनेक वेळा करण्यात आलेला आहे. पण त्याच प्रकारचे शस्त्र आता खेळाडूबाबत वापरण्यात येत असेल, तर अनेक क्रिकेटपटूंचा बळी जाऊ शकतो. ज्या इंग्लंडमध्ये क्रिकेटचा जन्म झाला तो देश क्रिकेट खेळाचे वर्णन “जंटलमन्स गेम’ असा करतो. त्यामुळे या खेळामध्ये नेहमीच सभ्य वर्तणूक करण्याची आवश्‍यकता असते. मैदानावर प्रत्यक्ष सामना सुरू असताना दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये झालेली हमरीतुमरी किंवा उत्तरे-प्रत्युत्तरे याबाबत कधीही कारवाई केली जात नाही. कारण तो एक सामन्याचा भाग मानला जातो, पण मैदानाबाहेर जर अशा प्रकारे वक्‍तव्य केले जात असेल तर ती गांभीर्याने घेतली जातात, हेच या घटनेतून सिद्ध होत आहे. 

काही वर्षांपूर्वी भारताचा फिरकीपटू हरभजनसिंग आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू सायमंड्‌स यांच्यातील वाद हा साधारण याच प्रकारे होता. यावेळी हरभजनसिंगही बऱ्यापैकी अडचणीत आला होता. तो वाद मैदानावरील असल्यामुळे हरभजनसिंगला फक्‍त ताकीद देऊन सोडण्यात आले होते. पण वयाच्या अठराव्या वर्षी केलेल्या काही चुकीच्या आणि आक्षेपार्ह विधानांमुळे वयाच्या 27 व्या वर्षी ही कारवाई होऊ शकते, हा संदेश मात्र या घटनेने निश्‍चितच दिला आहे. इंग्लंडसारख्या देशामध्ये 18 वर्षे हे वय बालिश किंवा अपरिपक्‍व मानले जात नाही. 18 वर्षांपर्यंत त्यांची मते निश्‍चित तयार झालेली असतात. 

त्यातूनच रॉबिन्सन याने विधाने केली आहेत हे उघड आहे. एखाद्या क्रिकेटपटूमध्ये जरी अपार गुणवत्ता भरली असली तरी माणूस म्हणून संबंधित क्रिकेटपटू कसा आहे, हेसुद्धा आगामी कालावधीमध्ये बघितले जाणार आहे. समाज माध्यमातील कोणती गोष्ट कधी नष्ट होत नाही आणि ती कधीही समोर येऊन आपल्याला छळू शकते हे आता केवळ खेळाडूंनीच नाही तर सर्वांनीच लक्षात घ्यावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.