13 जूनपर्यंत मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे हवामान खात्याने मुंबईसह कोकण किनारपट्टी क्षेत्रात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

काल मुंबईला जोरदार पावसाने झोडपलं. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले होते.

रात्रभरापासून रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस पडत असून, किनारपट्टी भागात पूर्णतः ढगाळ हवामान आहे. सकाळपासून पावसाने येथे विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर मुसळधार सरी कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले. आज (गुरुवार) दिवसभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज असून मुसळधार पावसाच्या शक्‍यतेमुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

औरंगाबादेत काल झालेल्या मुसळधार पावसात विज पडून एका 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातल्या बाभूळगाव तरटे या गावात ही घटना घडली.

ही 18 वर्षीय तरुणी मका पेरणीसाठी आपल्या कुटुंबासह शेतात गेली असता वीज पडून या तरुणीचा मृत्यू झाला असून समृद्धी तरटे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.