पिंपरी – महापालिकेची प्रारूप प्रभागरचनेत काही प्रमाणात बदल झाल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. असे असतानाच महिलांचे आरक्षण जाहीर होणे अद्याप बाकी आहे. महापालिकेच्या 46 प्रभागांत 70 जागा महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे कधी राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमात न दिसणाऱ्या अनेक माजी नगरसेवकांच्या पत्नींचेही ब्रॅंडिंग सुरू झाले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग असल्यामुळे शहरात तीन सदस्यांचे 45 तर चार सदस्यांचा सांगवीचा 46 वा प्रभाग आहे. पालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या 139 आहे. त्यात अनुसूचित जाती 22, अनुसूचित जमाती 3, सर्वसाधारण खुल्या गटासाठी 114 जागा असणार आहेत. अंतिम प्रभागरचना जाहीर झाली आहे.
एससी, एसटीचेही आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र, आता महिलांचे आरक्षण जाहीर होणे अद्याप बाकी आहे. एससी आणि एसटी आरक्षणानंतर प्रभागांची गणिते बदली आहेत. महिला आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर कोण सुपात आणि कोण जात्यात, हे स्पष्ट होणार आहे. अनेक माजी नगरसेवकांना याबाबतची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे या सर्व नगरसेवकांना एकतर अन्य प्रभागांत संधी शोधावी लागणार आहे, अथवा कुटुंबातील महिलेला संधी द्यावी लागणार आहे.
पन्नास टक्के महिला आरक्षण लागू असल्याने माजी नगरसेवकांमध्ये धाकधूक वाढली आहे. त्यामुळे महिला आरक्षित जागा झाल्यास माजी नगरसेवकांनी कुटुंबातील सदस्याला निवडणुकीत उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. कधी राजकारणात न दिसणाऱ्या अनेक माजी नगरसेवकांच्या पत्नीचे आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेले पोस्टर सोशल मीडियावर झळकू लागले आहेत.