सांगवी – औंध जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहती मागील भागात मैलाशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम सुरू होते. त्या कामासाठी ठेकेदाराने महावितरणची परवानगी न घेता अनधिकृतपणे वीज जोड घेऊन काम सुरू केले. याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने गुरुवारी (दि. 19) प्रसिद्ध करताच संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दैनिक प्रभातचे आभार मानले.
प्रभातने “मैलाशुद्धीकरण केंद्राचे काम चोरीच्या विजेवर’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदाराने चोरून वीजपुरवठा घेण्यात येत असलेल्या वायर व इतर उपकरणे गायब केली आहेत. वृत्त प्रसिद्ध होताच वीज चोर खडबडून जागे झाले आहेत. बांधकाम ठेकेदाराने बांधकाम व इतर गोष्टींसाठी थेट वीजपुरवठा करणाऱ्या पेटीतून वायर टाकत काम करण्यासाठी वीज जोडणी केली होती. गेले तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून याठिकाणी काम केले जात होते.
या गोष्टीचा रुग्णालय प्रशासन व वीजपुरवठा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा उद्योग सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. प्रत्यक्ष ठिकाणी वीजपेटीतून व याठिकाणी असलेल्या पदपथावर असलेल्या पथदिव्याच्या खांबामधून वीज जोडणी करून वीजपुरवठा करणारी वायर प्लांट मध्ये गेल्याचे दिसून येत होते. परंतु वृत्त प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी सर्व वायर काढून टाकण्यात आल्या आहेत.
मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून होत असलेल्या या प्रकाराने वीज चोरी करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महावितरणने संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु महावितरण त्या ठेकेदाराकडून दंड वसूल करणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.