नवी दिल्ली – भारताचा स्टार बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकीरेड्डी याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. त्याने बॅडमिंटन कोर्टवर असा स्मॅश शॉट खेळला ज्याचा वेग बुलेट ट्रेनपेक्षा जास्त होता. साधारणपणे, बुलेट ट्रेनचा सर्वात वेगवान वेग ताशी 320 ते 380 किमी असल्याचे सांगितले जाते. मात्र सात्विकने या वेगापेक्षा अधिक वेगाने स्मॅश शॉट मारला आणि इतिहासात आपले नाव नोंदवले.
भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रांकीरेड्डी यानं बॅडमिंटनमधील पुरुष खेळाडूनं सर्वात वेगवान फटका मारण्याचा जागतिक विक्रम केला असून त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे, त्याच्या फटक्याचा वेग 565 किलोमीटर प्रति तास होता. या आधीचा विक्रम (2013 मध्ये 493 किमी/तास) मलेशियाच्या टॅन बून हेओंगच्या नावावर होता. बॅडमिंटनमध्ये अशी चमकदार कामगिरी आजपर्यंत कोणालाच करता आलेेेली नाही.
दरम्यान, महिलांमध्ये मलेशियाच्या टॅन पर्लीनं 438 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगासह सर्वात वेगवान महिला बॅडमिंटनपटू बनण्याचा जागतिक विक्रम नोंदवला.
एप्रिलमध्ये केले रेकॉर्ड, आता जाहीर…
सात्विक आणि पर्लीने एप्रिलमध्येच आपापले विश्वविक्रम मोडीत काढले होते, पण आता गिनीज बुकने त्यांची अधिकृत पुष्टी केली आहे. दोघांनी हे रेकॉर्ड 14 एप्रिल 2023 रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत न्यायाधीशांसमोर केले होते. सात्विकने जपानमधील सोका येथील योनेक्स फॅक्टरी जिम्नॅशियममध्ये हा विक्रमाी स्मॅश केला. त्यानंतर गिनीज बुकच्या न्यायाधीशांनी त्या दिवसाच्या गती मापन निकालांच्या आधारे नवीन जागतिक विक्रमाची पुष्टी केली आहे.