BWF Malaysia Open 2024 : भारताची अव्वल पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शनिवारी क्वालालंपूर येथे मलेशिया ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरीची उपांत्य फेरी जिंकली. सात्विक आणि चिराग यांनी शनिवारी दक्षिण कोरियाच्या ‘कांग मिन ह्युक’ आणि ‘सेओ सेउंग जे’ यांचा सरळ गेममध्ये पराभव करून मलेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मलेशिया ओपन सुपर 1000 च्या अंतिम फेरीत पोहोचणारी सात्विकसाईराज आणि चिराग ही पहिली भारतीय जोडी ठरली.
गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या या भारतीय जोडीने 47 मिनिटे रंगलेल्या रोमहर्षक उपांत्य फेरीत 21-18, 22-20 असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सात्विक आणि चिराग या जोडीने दुसऱ्या गेममध्ये पाच गेम पॉइंट वाचवून पुनरागमन केले आणि कोरियन जोडीचा पराभव केला.
PETRONAS Malaysia Open 2024
MD – SF
🇮🇳Satwiksairaj RANKIREDDY🏅
21 22 🇮🇳Chirag SHETTY🏅
🇰🇷KANG Min Hyuk
18 20 🇰🇷SEO Seung Jae🕚 in 47 minutes
— BWFScore (@BWFScore) January 13, 2024
सात्विक आणि चिराग त्यांच्या दुसऱ्या सुपर 1000 विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहेत. या जोडीने गेल्या वर्षी जूनमध्ये इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. भारतीय जोडीने इंडोनेशिया ओपनमध्येही याच कोरियन जोडीचा पराभव केला होता. सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीचा जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कांग मिन आणि सेओ सेउंग यांच्याविरुद्धच्या चार सामन्यातील हा तिसरा विजय आहे.
उपांत्यपूर्व फेरीतील एकतर्फी विजयाने उत्साही झालेल्या भारतीय जोडीने या सामन्यातही चांगली सुरुवात करून 9-5 अशी आघाडी घेतली. यानंतर चिरागने आश्चर्यकारक शॉट खेळून कोरियाच्या खेळाडूंना चकित केले. भारतीय जोडी पुन्हा एकदा चार गुणांची (17-13) आघाडी घेण्यात यशस्वी ठरली. भारतीय जोडीचे चार गेम पॉइंट होते आणि तिसऱ्या प्रयत्नात पॉइंट जिंकून पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये कोरियन जोडीने 11-6 अशी आघाडी घेत भारतीय जोडीला अडचणीत आणले. पहिल्या गेममध्ये कोरियन संघ 17-11 ने पुढे होता आणि सात्विक आणि चिराग या गेममध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात होते. सात्विक आणि चिराग यांनी 14-20 ने पिछाडीवर पडल्यानंतर योग्य वेळी आपली लय परत मिळवली आणि सलग आठ गुण मिळवत सामना जिंकला.