BWF India Open 2024 : भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे इंडिया ओपन बॅडमिंटन 2024 च्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी पुरुष एकेरीत माजी नंबर 1 बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये झालेल्या लढतीत बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या जोडीने 24व्या क्रमांकाच्या चीनी तैपेईची दुहेरी जोडी फेंग-चिह ली-फेंग जिन लीचा 21-15, 19-21, 21-16 असा पराभव केला. आता चिराग-स्वातिक या जोडीसमोर दुसऱ्या फेरीत चीनी ताइपेच्या लू चिंग याओ आणि यांग पो हान यांचे आव्हान असेल. हा सामना आज(गुरूवार,दि.18) सांयकाळी 4.15 वाजता सुरू होईल.
दुसरीकडे पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात 25व्या मानांकित किदाम्बी श्रीकांतला 18व्या मानांकित हाँगकाँग, चीनच्या ली चेउक य्यू याच्याकडून 24-22, 21-13 असा पराभव पत्करावा लागला. याशिवाय पुरुष एकेरीच्या लढतीत 50व्या मानांकित सतीश कुमारला जपानच्या तोकुमा ओबायाशीकडून 20-22, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
त्याचवेळी, BWF सुपर 750 स्पर्धेत महिला एकेरीत एकमेव भारतीय आकर्षी कश्यपला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या चेन यू फी हिच्याकडून 21-10, 21-9 असा पराभव पत्करावा लागला. दुसरी मानांकित चायनीज शटलर गत ऑलिम्पिक चॅम्पियन आहे.