Malaysia Open 2024 : भारताची अव्वल पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना रविवारी क्वालालंपूर येथे झालेल्या मलेशिया ओपन 2024 च्या रोमहर्षक फायनलमध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या लियांग वेईकेंग आणि वांग चांग यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आणि नुकताच खेलरत्नने सन्मानित झालेल्या सात्विक चिरागचे मोसमातील पहिली स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
सात्विक-चिराग यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले पण मलेशिया ओपनमध्ये रौप्यपदक जिंकणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली. त्याच्या आधी एकाही भारतीयाला कोणत्याही प्रकारची अंतिम फेरी गाठता आली नव्हती. मलेशिया ओपनमध्ये आतापर्यंत एकाही भारतीयाला विजेतेपद मिळालेले नाही. सात्विक-चिरागकडून अपेक्षा होत्या, पण त्यांनाही अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने सुवर्ण जिंकता आले नाही.
PETRONAS Malaysia Open 2024
MD – Final
🇨🇳LIANG Wei Keng🏅
9 21 21 🇨🇳WANG Chang🏅
🇮🇳Satwiksairaj RANKIREDDY
21 18 17 🇮🇳Chirag SHETTY🕚 in 58 minutes
— BWFScore (@BWFScore) January 14, 2024
बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रँकीरेड्डी आणि शेट्टी यांना 57 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या चिनी जोडीकडून 21-9, 18-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय जोडीने पहिला गेम सहज जिंकला. सात्विक-चिराग यांनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले आणि 21-9 अशा फरकाने पहिला गेम जिंकला. मात्र, चीनच्या जोडीने दुसरा आणि तिसरा गेम जिंकून विजेतेपद पटकावले.
दुसऱ्या गेममध्ये चीनच्या जोडीने 8-3 अशी आघाडी घेतली. भारतीय जोडीला येथून पुनरागमन करणे कठीण होते. मात्र, सात्विक-चिरागने पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि गुणसंख्या 19-16 अशी नेली. शेवटी, चिनी जोडीने 21-18 अशा फरकाने गेम जिंकला आणि सामना तिसऱ्या गेममध्ये नेला.
भारतीय जोडीने तिसऱ्या गेममध्ये चांगली सुरुवात करत 6-2 अशी आघाडी घेतली. अर्ध्या अखेरीस 11-7 अशी आघाडी होती. यानंतर चीनच्या जोडीने पुनरागमन करत स्कोअर 12-12 असा केला. त्यानंतर चीनच्या जोडीने चमकदार खेळ करत स्कोअर 21-18 असा करत तिसरा गेम आपल्या नावे केला. सरतेशेवटी, वांग चांग आणि लियांग वेईकेंग यांनी तिसऱ्या गेमसह सामना जिंकला आणि चॅम्पियन बनले.
BWF Malaysia Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी घौडदौड कायम, अंतिम फेरीत मारली धडक…
सामना प्रथमच 3 गेमपर्यंत पोहोचला…
सात्विक आणि चिराग यांचा सामना प्रथमच तिसऱ्या गेमपर्यंत गेला. या स्पर्धेत दोघांनी पहिले चारही सामने 2 गेममध्येच जिंकले होते. अंतिम फेरीतील पहिला गेम जिंकल्यानंतर दोघेही दुसरा गेमही सहज जिंकतील असे वाटत होते. पण दुसरा गेम 3 गुणांच्या फरकाने गमावल्यानंतर दोघांनीही तिसरा गेम 4 गुणांच्या फरकाने गमावला.