BWF India Open 2024 : भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी आणि बीडब्लूएफ (BWF) बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बीडब्लूएफ इंडिया ओपन बॅडमिंटन 2024 च्या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व (क्वार्टरफाइनल) फेरीत प्रवेश केला.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन सात्विक आणि चिराग या जोडीने दुसऱ्या फेरीत चीनी तैपेईच्या ल्यु चिंग याओ आणि यांग पो हान या जगातील 25व्या क्रमांकाच्या जोडीवर 21-14,21-15 असा सरळ गेममध्ये सहज विजय मिळवला. ही लढत 46 मिनिटे चालली.
Yonex Sunrise India Open S750
Schedule For 19/1/2024 [QF] pic.twitter.com/zZuJA77PCW— Just Badminton (@BadmintonJust) January 18, 2024
आता पुढे उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी सात्विक आणि चिराग यांचा सामना शुक्रवारी (दि.19) तीन वाजता किम अस्ट्रुप आणि अँडर्स स्कार्प रासमुसेन या पाचव्या मानांकित डेनमार्क जोडीशी होईल. या डेनमार्कच्या या जोडीनं ‘चेन बो चांग आणि लिऊ यी’ या चिनी जोडीला चुरशीच्या लढतीत 13-21, 22-20, 21-11 असे पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवत आगेकूच केली आहे.
तत्पूर्वी, बुधवारी भारताच्या या जोडीने पहिल्या फेरीत 24व्या क्रमांकाच्या चीनी तैपेईची दुहेरी जोडी फेंग-चिह ली-फेंग जिन लीचा 21-15, 19-21, 21-16 असा पराभव करत आगेकूच केली होती.