पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज कबड्डी संघ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन बाणेर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरुष व महिला सतेज करंडक कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात बादफेरीत बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन संघाने राकेशभाऊ घुले संघावर 37-32 अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
मध्यंतराला बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनकडे 19-16 अशी आघाडी होती. बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या सुरेंद्र कडलगे याने वेगवान खेळ करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली होती. अनुज गावडे यांने सुरेख पकडी घेत त्याला साथ दिली. राकेशभाऊ घुले संघाच्या अभिमन्यू गावडे याने जोरदार प्रतिकार केला मात्र त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
शाहू सडोली संघाने मिडलाईन रायगड संघाचा 41-35 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला शाहू सडोली संघ 14-20 असा पिछाडीवर होता. शाहू सडोली संघाच्या रोहित साठे याने मध्यांतरानंतर जोरदार खेळ करीत आपली पिछाडी भरून काढली. नंदुरबारच्या एनटीपीएस संघाने मंबई शहरच्या गुडमॉर्निंग संघावर 51-31 असा दणदणीत विजय मिळविला. मध्यांतराला एनटीपीएस संघाकडे 23-17 अशी आघाडी होती. एनटीपीएस संघाच्या विवेक राजगुरू व ऋषिकेश बनकर यांनी चौफेर चढाया करीत
मैदान गाजविले.
महिला विभागात शिवाजी व्यायाम मंडळ सांगली संघाने राजा श्री शिवछत्रपती संघावर 44-27 अशी मात करीत विजय मिळवला व उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. शिवाजी व्यायाम मंडळाच्या अनजा शिंदे हिने चांगल्या चढाया करीत विजय सोपा केला. तर कोमल अणूसे व श्रद्धा माळी यांनी चांगल्या पकडी घेतल्या.
शिवशक्ती मुंबई शहर संघाने कर्नाळा स्पोर्ट्स संघावर 33-14 असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. शिवशक्ती संघाच्या रक्षा नारकर व प्रतिक्षा तांडेल यांनी जोरदार हल्ला करीत कर्नाळा स्पोर्ट्स संघाची दाणादाण उडविली. अन्य लढतीत पुरुष गटात वाघजाई रत्नागिरी संघाने स्वस्तिक संघावर 39-32 असा विजय मिळवला. महिलांच्या गटात प्रकाशतात्या बालवडकर संघाने बारामती स्पोर्ट्स अकादमीवर मात केली तर महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनने श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचा पराभव केला.