सातारा – जलजीवन मिशनची प्रचार प्रसिद्धी होण्यासाठी पाणी या विषयक विविध बाबींना अनुसरून लघुपट निर्मिती स्पर्धा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी लघुपटाची निर्मिती ही स्वत: केलेली असणार आहे, या स्पर्धेत तरुणांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले आहे.
लघुपट निर्मितीसाठीची पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्व संगीत, गीत, चित्रीकरण हे स्वतः तयार केलेले असावे. अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकीय विभाग यांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेले लघुपट या स्पर्धेसाठी सादर करण्यात येऊ नये.
या स्पर्धेसाठी सादर करण्यात येणाऱ्या लघुपटाबाबतचे कॉपी राईट बाबतचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकांकडून घेण्यात येणार आहे. लघुपट निर्मितीसाठी वापरण्यात आलेले शुटिंग साहित्य प्रोफेशनल दर्जाचे असावे. लघुपट निर्मितीसाठीच्या भाषेचा वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावणारा नसणार आहे. या स्पर्धेसाठी जमा करण्यात आलेले लघुपट स्पर्धेसाठी पात्र व निवडीचे अधिकार प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद यांच्याकडे असणार आहेत.
या स्पर्धेसाठी पाण्याचे शाश्वत स्त्रोत, पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती, जल संवर्धन, हर घर जल घोषित गाव विकास, जल जीवन मिशन यशोगाथा, विविध योजनांचे कृतीसंगम या अशा विषयावरील लघुपट तयार करणे अपेक्षित आहे. लघुपट स्पर्धेसाठी एक सहभागी स्पर्धक एकाच विषयावरील लघुपट सादर करू शकतील. लघुपट स्पर्धेसाठीचा लघुपट दि. १५ रोजी कार्यालयीन वेळे पुर्वी जमा करण्यात यावा. या स्पर्धेसाठी 3 ते 5 मिनिटाची लघुपट निर्मिती करणे आवश्यक आहे. या विषयातील तज्ञ समितीच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर सादर केलेल्या सर्व लघुपटाचे जिल्हा स्तरावर स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.
या स्क्रीनिंग नंतर प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढून लघुपट विजेत्या स्पर्धकाची अंतिम निवड जिल्हास्तरीय समिती मार्फत करण्यात येणार आहे. निवड केलेल्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय जल जीवन विषयक कार्यक्रमात किंवा जिल्हास्तरीय कार्यशाळेत बक्षीसाचे वितरण करून सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत निवड झालेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमांकाच्या स्पर्धकास अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार रुपये, ११ हजार रुपये अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.