खडकवासला : सिंहगडावर पर्यटक म्हणून आलेली महिला पाय घसरून पडून जखमी झाल्याने तीचे मदतीसाठी वनविभाग आणि वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक धाऊन आले. स्थानिक घेरा सिंहगड ग्रामस्थांकडून देखील वेळीच मदत झाल्यामुळे या महिलेला गडावरुन खाली सुखरुप उचलून आणण्यासाठी वेळीच मदत झाली. स्थानिकांचे मदतकार्यातील एकूणच योगदान आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
अनया धारणे (वय 30 रा. आंबेगाव) ही महिला पर्यटक सिंहगडावर सहलीसाठी आली होती. गडावरुन पायी निघताना पाय घसरून ही तरुणी पडली व तिचा पाय मुरगळला. काही पर्यटकांनी वनविभागाचे कर्मचारी संदीप कोळी यांना या बाबतची माहिती दिली. संदिप कोळी यांनी तातडीने वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक रमेश खामकर, अनिल जोरकर, अनंता जोरकर, धनाजी सांबरे, गणेश सांबरे, रेखा मिसाळ यांचेसह घटनास्थळी धाव घेतली. पर्यटक तरुणी वेदनेमुळे रडत होती.
तिला हालचाल करता येत नसल्याने तिला खाली उचलुन आणण्याशिवाय इतर पर्याय देखील नव्हता. आतकरवाडी येथील स्थानिक गावकरी महेश सांबरे, योगेश सांगळे अमोल पवार, आतकरवाडी समितीचे अध्यक्ष पांडुरंग सुपेकर, हे सुध्दा लगेच त्या ठिकाणी मदतीसाठी पोहचले. जखमी पर्यटक महिलेस वनसंरक्षण समितीचे कर्मचारी व इतर सर्वांनी स्ट्रेचरवर घेऊन उचलुन आतकरवाडी येथे पायथ्याशी गावात आणले आणि पुढील उपचारासाठी रूग्णालयात पाठवले.