सातारा (प्रतिनिधी) : राज्यातील गडचिरोली या नक्षलवादी भागात कौतुकास्पद केलेल्या कामगिरीची दखल घेऊन सातारा जिल्ह्यातील एका डीवायएसपींसह तीन पोलीस उपनिरीक्षकांना केंद्र शासनाच्या वतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक व सध्या कोल्हापूरला कार्यरत असलेले डाॅ. देशमुख यांनाही हे पदक जाहीर झाले आहे.
केंद्र सरकारच्यावतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नक्षलवादी भागात खडतर सेवा पार पाडल्याबद्दल गृह विभागाच्यावतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक दिले जाते. हे पदक महाराष्ट्रात नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भरघोष योगदान देणाऱ्या पोलीस अधिकार्यांना दिले जाते.
सातारा जिल्ह्यातील वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, मायणीचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे, पोलीस कल्याणचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांना हे पदक बुधवारी जाहीर झाले. जिल्ह्यातील पदकप्राप्त फौजदारांचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांनी अभिनंदन केले.