– ससून रूग्णालय ड्रग्ज तस्करी पलायन प्रकरण
पुणे – ससून रुग्णालयामधून पलायन केल्याप्रकरणी ड्रग्ज तस्कर ललित पाटील व ललितला पळून जाण्यास मदत करणाऱ्या सचिन वाघ या दोघांवर पोलिसांकडून तब्बल २ हजार ६०० पानांचे पुरवणी दोषाराेपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात यापूर्वी सहा जणांवर २ हजार २०० पानांचे दोषाराेपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार या गुन्ह्यात आता एकूण ४ हजार ८०० पानांचे दोषाराेपपत्र दाखल झाले आहे.
यापूर्वी ललित पाटीलच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम (३३) आणि अॅड. प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (३९, दोघीही रा. नाशिक), ललितचा भाऊ भूषण पाटील (३४) साथीदार अभिषेक बलकवडे (३१, सर्व रा. नाशिक) रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अर्हाना (५०, रा. कॅम्प), त्याचा चालक दत्तात्रेय डोके (४०, रा. हडपसर) यांच्याविरोधात तब्बल २ हजार २०० पानांचे दोषाराेपपत्र दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २२३ (सरकारी कर्मचार्याला बेदरकारपणे कैदेतून किंवा कोठडीतून पळून जाणे), २२४,२२५ (कायदेशीर अटक करण्यास विरोध करणे), १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे) आणि २०१ (पुरावे नष्ट करणे) आणि ३४ (समान हेतू) या कलमांनुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.आता ललित पाटील आणि सचिन वाघ या दोघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
दाखल करण्यात आलेले पुरवणी आरोपपत्र हे २६०० पानांचे असून त्यामध्ये तब्बल ४५ जणांचे जबाब, साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त तसेच प्रभारी सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई आणि त्यांच्या पथकाने तपास करून दोघांवर दोषाराेपपत्र दाखल केले.