जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये उपक्रम; ‘स्विप’ अंतर्गत उपक्रम
सातारा : मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्विप’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी मतदार जनजागृतीसाठी संकल्प पत्र लिहित आहेत.
स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम सुरु केले आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करुन स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती करण्याच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गामधील विद्यार्थ्यांकडून मतदान कर्तव्याबाबत आवाहन करणारे संकल्प पत्र लेखन करून घेण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी ,विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांनी सकाळी 11 ते 12 या वेळेत संकल्प पत्र लेखन करून तीन संकल्प लेखन पत्रांची निवड करण्यात आली. प्रातिनिधीक स्वरूपात एका विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांना संकल्प पत्र देण्यात आले. मतदारांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी स्विप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे अर्चना वाघमळे यांनी सांगितले.