पुणे – अंगणवाडी संपकाळात बडतर्फ केलेल्या 132 अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पुन्हा रूजू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. कामावरून काढून टाकण्यात आलेल्या या कर्मचार्यांना एक संधी देण्यात आली व सर्व 132 अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका व मदतनीस यांना कामावर रुजू करून घेतले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली.
बडतर्फ केलेल्या अंगणवाडी कर्मचार्यांनी केलेल्या अपिलाची सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे घेण्यात आली. संपकाळात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद राहिल्या. तसेच बालकांना पोषण आहार न मिळाल्याने त्यांचे वजन घटले. आता सर्व अंगणवाड्या पूर्ववत सुरू झाल्याने उपस्थित बालकांची तपासणी केली जात आहे. ज्या बालकांना पूरक पोषण आहाराची गरज आहे, त्यांना तो देण्यात येईल.
तसेच आवश्यकता असल्यास वैद्यकीय उपचारदेखील केले जाणार असल्याचे गिरासे यांनी सांगितले. सेवेतून काढून टाकलेल्या अंगणवाडी कर्मचार्यांना पुन्हा रुजू करून घेताना त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. पुन्हा गैरवर्तन होणार नाही, अशी हमी या अंगणवाडी कर्मचार्यांनी दिल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.