फलटण – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवार, दि. २६ रोजी माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण आणि अकलूज दौऱ्यावर येणार असून ते व्यापारी, सर्वसामान्य लोकांना भेटून केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकास कामाबाबत चर्चा करणार आहेत. तसेच यावेळी विविध मान्यवरांचा भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे,स्वराज नागरी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, बाळासाहेब काशीद, अभिषेक पंत, तेजस माने, युवराज सस्ते, जालिंदर सस्ते आदी उपस्थित होते.
राज्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे हे दौरा करत असून त्याचा शेवट माढा लोकसभा मतदारसंघात होणार आहे. दि. २६ रोजी सकाळी १० वाजता ‘घर चलो अभियान ‘ अंतर्गत छञपती शिवाजीमहाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत पायी जात व्यापारी, सर्वसामान्य लोकांना भेटणार आहेत. यामध्ये ते केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकास कामाबाबत चर्चा करणार आहेत. लोकांची मते जाणून घेणार आहेत.
याच वेळी शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा लाभार्थी मेळावा होणार आहे. यावेळी आ जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील उपस्थित राहणार आहेत. याचवेळी विविध मान्यवरांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. त्यानंतर ते अकलूज येथे जाणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.