सातारच्या जागेसाठी पुरुषोत्तम जाधवांच्या उमेदवारीची आग्रही मागणी
सातारा – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक शरद कणसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बैठका घेऊन, परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा आणि जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी या बैठकांमध्ये केली.
पुरुषोत्तम जाधव, जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख रणजित भोसले, महिला संघटक शारदा जाधव, आजी-माजी पदाधिकार्यांच्या उपस्थितीत वाई-महाबळेश्वर-खंडाळा, सातारा-जावळी, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण या विधानसभा मतदारसंघांमध्ये बैठका घेण्यात आल्या.
वाई विधानसभा मतदारसंघातील बैठकीत तेथील नवीन पदाधिकार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाची बैठक मेढा येथे घेण्यात आली. मराठा समाजाला कुणबी दाखले मिळण्यासाठी मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आगामी निवडणुकांसाठी जिल्ह्यात शिवसैनिक सज्ज असल्याचे चित्र या बैठकांमधून दिसले.
शिवसेनेची ताकद वाढली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने, त्यांनी विशेष लक्ष देऊन, जिल्ह्यात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार आहेत. त्यात एक पालकमंत्रिपद असल्याने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढल्याचे मत या बैठकांमध्ये व्यक्त करण्यात आले.
2009 मध्ये लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मी लढवली होती. त्यावेळी पोटनिवडणुकीमुळे हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला होता. त्यात जो उमेदवार निवडून आला, तो फक्त एक लाखाच्या फरकाने विजयी झाला. मात्र, आताची परिस्थिती वेगळी आहे. विरोधकांची ताकद दुभंगलेली असल्याने जिल्ह्यात महायुतीची ताकद मोठी आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जो आदेश असेल, त्याचे पालन करणार आहे. उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवणार आहे. संभाव्य चेहरे अनेक असले तरी महायुतीतील ज्या कोणाला तिकीट मिळेल, त्या उमेदवाराचे काम करणार आहे.
– पुरुषोत्तम जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख