सातारा -‘मारूथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटी’ दरोड्यातील सोन्याची साताऱ्यात विल्हेवाट लावणारे संशयित पंचमुखी परिसरातील सराफ आणि एका डॉक्टराच्या शोधासाठी सातारा पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. हे संशयित शोधण्यासाठी केरळ पोलिसांनी मदत करण्याची विनंती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना केली आहे. निश्चितच सहकार्य करण्याची ग्वाही बंसल यांनी दिली असल्याची माहिती केरळ पोलिसांनी दिली.
केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील ‘मारूथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटी’ वर दि. 24 जुलै रोजी पडलेल्या दरोड्यात साडेसात किलो सोने आणि अठरा हजारांची रक्कम चोरीला गेल्याचा उलगडा दि. 26 जुलै रोजी झाला. केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये परेश अशोक अंबुर्ले उर्फ निखिल अशोक जोशी याचा सहभाग आहे.
याचा तपास करताना सोने चोरीचे साताऱ्यातील संदर्भ व येथील बडया धेंडांची नावे समोर आली. यानंतर केरळ पोलिसांनी निखिल जोशी याला दि. 6 ऑगस्ट रोजी येथील “हॉटेल फर्न’मधून अटक केली. परेश अशोक अंबुर्ले उर्फ निखील अशोक जोशी याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरू होती. दरोड्यातील काही सोने साताऱ्यातील काही सराफांनी कमी दराने खरेदी केले आहे.
ज्यांनी खरेदी केली त्यापैकी काही सराफांची नावे केरळ पोलिसांना समजल्यानंतर त्या सराफांची केरळ पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. या चौकशीतून 2.40 किलो सोने हस्तगत केले आहे. हे सोने साताऱ्यातील पंचमुखी परिसरातील सराफ आणि प्रतिभा हॉस्पिटलचे व्यवस्थापन पाहणारा एक डॉक्टर या दोघांनी संबंधित सराफांना वितरित केले होते.
मात्र, केरळ पोलिसांच्या रडारवर दोन्ही संशयित आल्यानंतर ते गायब
असून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, ते सापडलेले नाहीत. केरळ पोलिसांनी ते फरारी झाले असल्याचे सांगून त्यांना शोधण्यासाठी सातारा पोलिसांनी सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.
दरम्यान, गेले वीस दिवस केरळ पोलीस साताऱ्यात तळ ठोकून होते. ही टीम रविवारी रात्री उशिरा केरळकडे रवाना झाली. सोमवारी ती केरळमध्ये दाखल झाली असून त्यांनी आपला अहवाल सादर करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली होती. केरळच्या कसबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. एस. राजीव यांनी याबाबतची माहिती दिली.