सातारा : भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अपशिंगे (ता. कोरेगाव) येथील साहिल संजय पवार यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
साहिलचे वडील संजय पवार हे नुकतेच ते भारतीय सैन्यदलातून सुभेदार मेजर पदावरूननिवृत्त झाले आहेत. वडील लष्करात असल्याने साहिलचे शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झाले. वडिलांच्या बदल्यांनुसार, त्याने देशभरातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेतले. शालेय शिक्षणाबरोबर राज्यस्तरीय बास्केटबॉल आणि क्रिकेटपटू म्हणूनही त्याने नावलौकिक मिळवला आहे. आठ सुवर्णपदके आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
साहिलने चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रथम वर्षाचे प्रशिक्षण गया (बिहार) येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीत, तर तीन वर्षांचे ऑफिसर्स ट्रेनिंग दापोडी (पुणे) येथील मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पूर्ण केले.
साहिलची आई सौ. भारती या गृहिणी, तर बहीण वैष्णवी हिची इंडिगो एअरलाइन्समध्ये हवाईसुंदरी म्हणून नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.