सातारा – शालेय प्रथम सत्र परीक्षा संपल्याने बच्चे कंपनी साताऱ्यात दिवाळीच्या स्वागतासाठी किल्ला बनविण्याच्या तयारीला लागली आहे. शहरात गल्लोगल्ली मातीचा चिखल बनवून किल्ला तयार करणाऱ्या चिमुकल्यांची लगबग दिसून येत आहे. राजवाडा परिसरात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे तयार किल्ले, मातीचे मावळे व छत्रपती शिवरायांच्या प्रतिकृती खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
दीपोत्सवासाठी आता तीनच दिवस उरले असून सातारा नगरी दीपावलीसाठी सज्ज झाली आहे. किल्ले बनवण्यात बालगोपाळ मग्न झाले आहेत. तोफा, हत्ती, घोडे, मावळे विकत घेण्यासाठी गोलबाग परिसरात बच्चे कंपनी आपल्या पालकांसोबत दिसून येत आहेत. रेडिमेड किल्ले दीडशे रुपयांपासून साडेसातशे रुपयांपर्यंत उपलब्ध होत आहेत. भालदार, चोपदार, तुतारीवाले, शस्त्रसज्ज मावळे, छत्रपती शिवरायांच्या छोट्या रेखीव प्रतिकृतींनासुध्दा चांगलीच मागणी आहे. त्याबरोबरच आधुनिक युगातील स्मार्ट मुले अत्याधुनिक साधनांच्या, वाहनांच्या प्रतिकृतीही आपल्या सजावटीमध्ये दाखल आहेत.
दिवाळी जवळ आली की माती आणणे, किल्ला बनवण्याची जागा निवडणे, किल्ल्याचा आकार ठरवणे, वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती गोळा करून त्यांचा इतिहास जाणून घेणे व त्यानंतर योग्य किल्ला तयार करणे असे बच्चे कंपनीचे नियोजन सुरू होते. सध्या, किल्ल्यावर ठेवण्यासाठी विविध मूर्तींची खरेदी केली जात आहे.
याशिवाय, रात्री किल्ला आकर्षक दिसावा म्हणून अनेक बालगोपाळ किल्ल्यावर विद्युत रोषणाई करण्यास पसंती देत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून किल्ल्याबाबत जास्तीतजास्त माहिती गोळा करून त्यांना आधुनिक, आकर्षक रूप देण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे. किल्ल्याच्या आजूबाजूला हिरवळीसाठी हळिव किंवा मोहरी पेरली आहे.
रेडिमेड किल्ल्यांची विक्री
बाजारामध्ये रेडिमेड किल्ले विक्रीसाठी आले आहेत. त्यामध्ये शिवनेरी, रायगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड, पन्हाळा, विशाळगड, हरिश्चंद्रगड, राजगड अशा विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध आहेत. या किल्ल्यांच्या किमती दोनशे रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत आहेत.
परंतु, रेडिमेड किल्ला खरेदी करण्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. मावळे, तोफा, हत्ती, घोडा, उंड, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती यांची खरेदी करण्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिकृतींची विक्री दहा ते वीस रुपयांना करण्यात येत आहे. साताऱ्यात उदयनराजे मित्र समूह, महाराणी येसूबाई फाउंडेशन, शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने किल्ला बनवा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने देखणे किल्ले निर्मिती पाहावयाला मिळणार आहे.