हिंजवडी – माण येथील युवा उद्योजक किरण शांताराम राक्षे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने पुणे जिल्हा युवकचे अध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांच्या स्वाक्षरीने किरण राक्षे यांना राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र दिले. या वेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, युवक अध्यक्ष सागर साखरे, समीर बुचडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
मूळचे माण गावचे रहिवासी असलेल्या राक्षे यांनी यापूर्वी युवकचे जिल्हा सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विचारांनुसार पक्षाची ध्येयधोरणे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून, जिल्ह्यात युवकांची मोठी फळी निर्माण करणार असल्याचे राक्षे यांनी निवडीनंतर सांगितले.