शिक्षकांनी गृहभेटीतून ऑफलाइन शिकवला प्रथम सत्राचा अभ्यासक्रम
ठोसेघर (प्रतिनिधी) – करोना काळात पावणेदोन वर्षांपासून शाळा व महाविद्यालये बंद होती. या काळात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय आहे; परंतु त्यात अनेक अडचणी येत आहेत. अनेक पालकांकडे मोबाइल्स नाहीत आणि दुर्गम भागात मोबाइलला नेटवर्कच नाही. त्यातच विद्यार्थी मोबाइलचा गैरवापर करू लागले आहेत. त्यामुळे पेट्री बंगला जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या मोबाइल वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शिक्षकांनी प्रथम सत्राचा अभ्यासक्रम गृहभेटीतून ऑफलाइन पूर्ण केला आहे.
ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली पालकांकडून मोबाइल घेऊन गेम खेळणे, कार्टून पहाणे, चॅटिंग करणे, असे प्रकार होत आहेत. विद्यार्थी अभ्यासाकडे मनापासून लक्ष देत नाहीत. त्यामुळे पालक व शिक्षकांची चिंता वाढली आहे. यावर तोडगा काढत सातारा तालुक्यातील पेट्री बंगला जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी थेट विद्यार्थ्यांच्या गावांमध्ये जाऊन ऑफलाइन अध्यापनावर भर दिला.
शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच तिन्ही शिक्षकांनी आपापल्या विषय व घटकांचे प्रत्यक्ष अध्यापन सुरू ठेवले. वांजळवाडी, घाटवण, देवकल, अंबाणी, पेट्री, पिसाणी, अनावळेवाडी, जांभळ मुरे, अनावळे ही गावे सुरुवातीपासून करोनामुक्त आहेत.
तेथील विद्यार्थी पेट्री बंगला शाळेत शिकतात. त्यामुळे पालकांची संमती व ग्रामशिक्षण समितीच्या ठरावाने ऑगस्टपासून सर्व विद्यार्थी शाळेत बोलावून नियमित कामकाज व अध्यापन सुरु ठेवले. सप्टेंबरअखेर या शाळेन सर्व इयत्ता व सर्व विषयांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे. आता शासन नियमाप्रमाणे शाळा सुरू झाल्यावर या शाळेत उजळणी व सराव सुरू आहे.
या शाळेच्या अनोख्या व धाडसी उपक्रमामुळे लॉकडाऊनच्या काळात गावी आलेल्या अनेक पालकांनी मुंबई, पुणे, सातारा येथील इंग्रजी माध्यमाची मुले या शाळेत दाखल केली आहेत. या उपक्रमामुळे या शाळेची गुणवत्ता वाढल्याचे अनेक पालक सांगतात. ऑनलाइन स्वाध्याय सोडविणे व इतर महत्त्वाच्या ऑनलाइन अभ्यासासाठी शिक्षक त्यांचे मोबाइल विद्यार्थांना देत आहेत. या निर्बंधांचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांवर झाल्याचे जाणवत आहे.
माझी मुलगी पेट्री बंगला शाळेत सातवीत शिकत आहे. लॉकडाऊनमध्ये शिक्षकांनी घरी जाऊन आणि मुलांना शाळेत बोलावून चांगल्या प्रकारे शिकवले. माझ्या मुलीचा इंग्रजी हा आवडता विषय झाला आहे. विशेषत: व्याकरणावर शिक्षकांनी भर दिल्याने मुलांना भविष्यात फायदा होणार आहे.
– विठ्ठल शिंदे, पालक
शैक्षणिक वर्ष 16 जूनला सुरू झाल्यापासून मी इंग्रजी व विज्ञान या विषयांचे इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या वर्गांमध्ये ऑफलाइन शिकवून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या माझा सराव सुरू आहे. पालकांच्या संमतीने मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्यात यशस्वी झालो आहोत.
– लक्ष्मण गोरे, शिक्षक