कोथरूड – चांदणी चौकातील बहुमजली उड्डाणपूल आणि पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामध्ये कोथरूड येथील डावी भुसारी कॉलनीतील श्रृंगेरी मठाशेजारील अपूर्ण असलेल्या सर्व्हिस रस्त्याच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. हा रस्ता सुरू झाल्यानंतर चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, तसेच कोथरूडकडे येणाऱ्या वाहनचालकांचा त्रास कमी होणार आहे.
श्रृंगेरी मठाशेजारील भागातून महात्मा सोसायटीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कोथरूडकडून वारजे, सातारा, कात्रज याठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांना वेदभवन येथील सर्व्हिस रस्ता किंवा चांदणी चौकाला फेरा मारून इच्छित स्थळी जावे लागत आहे.
मात्र, चांदणी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे मुळशी, कोथरूड, पाषाण यासह मुंबईकडून येणारी वाहतुकीसाठी एकच रस्ता आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी नित्याचीच ठरलेली आहे. त्यामुळे श्रृंगेरी मठाशेजारील सर्व्हिस रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
येत्या तीन महिन्यांतच या सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण होऊन रस्ता वातुकीसाठी खुला होईल. त्यामुळे भुसारी कॉलनीसह कोथरूडमध्ये येणाऱ्या नागरिकांना या रस्त्याचा फायदा होणार असून, वाहतूक कोंडीच्या त्रासापासून मुक्त होतील.
– अल्पना गणेश वरपे, नगरसेविका