खंडाळा – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे खंबाटकी घाटात शनिवारी (दि. 13) रात्री 10 च्या सुमारास मालवाहतुकीच्या आयशर ट्रकने पेट घेतला. ट्रकचालक विशाल सुरेश काकडे (वय 35, रा. कवठे, ता. वाई) हे सुखरूप बाहेर आल्याने, सुदैवाने जीवितहानी टळली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विशाल काकडे हे त्यांच्या मालकीच्या ट्रक (एमएच-14-केए-1130) मधून माल घेऊन शनिवारी (दि. 13) रात्री सातारच्या दिशेने निघाले होते. खंबाटकी घाटाच्या मध्यभागी आल्यानंतर ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकचालक विशाल काकडे हे प्रसंगावधान राखून सुखरूप बाहेर आल्याने जीवितहानी टळली.
काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने ट्रक जळून खाक झाला. या घटनेमुळे घाटातून निघालेल्या इतर वाहनचालकांची आणि प्रवाशांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ येथील एशियन पेंट कंपनीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दिग्विजय पोळ, अमित चव्हाण, नितीन महांगरे, महामार्ग पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गालिंदे, सहाय्यक फौजदार मुलाणी, पोलीस अंमलदार कचरे, गायकवाड, वाघमारे, महामार्ग गस्तीपथक आणि शिरवळ रेस्क्यू टीमचे सहकार्य लाभले.