चिखली – कुदळवाडी येथील मोरे पाटील चौकात चिखली बीआरटी मार्गात साधारण एक महिन्यापासून स्ट्रॉर्म वॉटरलाइनचा चेंबर ओव्हरफ्लो होऊन मैलामिश्रित पाणी रस्त्यावर वाहत होते. याबाबत दैनिक प्रभातने बुधवारी (दि. 10) ‘बीआरटी मार्गातील चेंबर तुंबलाय, बघितलं का?’ मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच शनिवारी (दि. 13) महापालिकेच्या वतीने चेंबरची दुरुस्ती करण्यात आली.
मोरे पाटील चौकात चिखली-पिंपरी बीआरटी मार्गात मागील एक महिन्यापासून स्ट्रॉर्म वॉटरलाइनमध्ये सांडपाणी वाहिनीचे मैलामिश्रित पाणी येत असल्याने चेंबर तुंबले होते. त्यामुळे चेंबरमधून दूषित पाणी रस्त्यावर येत होते. परंतु हा रस्ता बीआरटीचा असल्याने महापालिकेचा ड्रेनेजविभाग याकडे लक्ष देत नव्हता. तर बीआरटी विभाग दुर्लक्ष करत होता.
यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त होते. या चेंबरचे झाकण बाजूला काढून ठेवल्याने नागरिक व वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत प्रभातने वृत्त प्रसिद्ध करताच बीआरटी प्रशासन व आरोग्य विभागने दखल घेत येथील समस्या सोडविली. ही समस्या सोडविण्यासाठी माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी देखील वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे कुदळवाडीतील ग्रामस्थांनी दै. प्रभात व यादव यांचे विशेष आभार मानले.