सातारा – जिल्ह्यात जानेवारी महिन्यातील उच्चांकी 981 करोना पॉझिटिव्ह काल (दि. 13) च्या अहवालांमध्ये आढळले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 18.41 टक्क्यांवर गेला आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
करोना आणि ओमायक्रॉन अशा दुहेरी संकटाचा सामना जिल्हा प्रशासन करत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी तालुकानिहाय करोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णांना आधार मिळाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण दोन लाख 57 हजार 486 जण बाधित आढळले असून, सहा हजार 508 नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पाच हजार 327 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 981 बाधित आढळले आहेत. गेल्या दीड महिन्यात परदेशातून एक हजार 32 नागरिक आले असून, एक हजार नागरिकांशी संपर्क झाला आहे.
32 नागरिकांशी अद्याप संपर्क झालेला नाही. 780 नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून, 20 जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. परदेशातून आलेले 11 आणि स्थानिक दोन, असे एकूण 13 जण ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिली.