शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. दीपक जितेंद्र रायपुरे (वय 19, रा. पेरणेफाटा ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अग्निशामक दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.
कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत शुक्रवारी (दि. 14) सकाळच्या सुमारास विजयस्तंभाच्या पाठीमागील बाजूने दीपक रायपूरे याने नदीमध्ये उडी मारल्याचे काही नागरिकांना दिसले, त्यांनी आरडाओरडा केला तर काही नागरिकांनी युवकाचा पाण्यामध्ये शोध घेतला मात्र जलपर्णीमुळे अडचणी येत होत्या.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अग्निशमन केंद्राच्या जवानांना बोलाविण्यात आले असता अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले. काही वेळानंतर दीपक रायपूरे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.