सातारा – भरीव विकास कामांचा समावेश असलेला सातारा पालिकेचा 466 कोटी 33 लाख 84 हजार 300 रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासकीय सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला. पालिकेच्या गंगाजळीत यंदाच्या आर्थिक वर्षात तीन लाख 88 हजार 300 रुपयांची शिल्लक दाखवण्यात आली आहे. पालिकेला महसुली जमा खर्च आणि भांडवली जमा खर्च यांचा ताळमेळ बसवताना बरीच कसरत करावी लागली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पुढील वर्षी दहा टक्के लोकवर्गणी
देण्याकरिता विविध प्रकल्पांसाठी 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात प्रशासक अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, मुख्य अभियंता दिलीप चिद्गे, मुख्य लेखापाल आरती नांगरे, सहायक लेखापाल हिंमतराव पाटील, लेखा विभागाचे वरिष्ठ लिपिक भालचंद्र डोंबे तसेच सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
पालिकेच्या सुधारित अर्थसंकल्पाचे वाचन भालचंद्र डोंबे यांनी केले. 2023- 24 या अंदाजपत्रकामध्ये उत्पन्नांच्या बाजूचा विचार करता मालमत्ता कर 21 कोटी रुपये, पाणी कर सहा कोटी रुपये, विशेष स्वच्छता कर एक कोटी 75 लाख, अग्निशमन कर तीस लाख, इमारत भाडे व खुल्या जागा भाडे दीड कोटी, हातगाडा परवाना फी 30 लाख, नाट्यगृह भाडे पाच लाख, विकास कर साडेतीन कोटी, प्रीमियम चार कोटी, मंडई फी 12 लाख, महसुली अनुदाने 48 कोटी 13 लाख 50 हजार व भांडवली अनुदाने 138 कोटी 88 लाख दहा हजार अशा उत्पन्नाच्या ठळक बाबी नोंदविण्यात आल्या आहेत खर्चाच्या बाबींमध्ये कर्मचारी वेतन भत्ते 27 कोटी 40 लाख, निवृत्ती वेतन 16 कोटी, सातवा वेतन आयोग फरक दोन कोटी चाळीस लाख, कार्यालयीन प्रशासकीय खर्च 13 कोटी 21 लाख 15 हजार, मालमत्तांची दुरुस्ती 10 कोटी 18 लाख, शिक्षण मंडळ अंशदान साडेतीन कोटी, शासकीय कर्ज परतफेड दोन कोटी 30 लाख, पाणीपुरवठाविषयक सोयी दोन कोटी 55 लाख, निवडणूक खर्च एक कोटी सत्तर लाख, थोर व्यक्ती जयंती वर्धापन दिन 15 लाख, पर्यावरण संतुलन 50 लाख, 5 टक्के दिव्यांग कल्याणकारी योजना 40 लाख, मागासवर्गीय कल्याण निधी 40 लाख, महिला बालकल्याण निधी 40 लाख या ठळक बाबींचा खर्चात समावेश आहे.
भांडवली विकास कामांसाठी विचार करता नगरपरिषद प्रशासकीय इमारतीसाठी 30 कोटी, हद्दवाढ क्षेत्र विकास योजना 35 कोटी, अधिसूचित नागरी सेवा व सुविधा मजबुतीकरण दहा कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजना दहा कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना 17 कोटी, दलितेतर योजना 11 कोटी 50 लाख, पोवई नाका येथे शिवतीर्थ विकसित करणे आठ कोटी व अमृत योजनेअंतर्गत गोडोली तळे विकसन, कास धरण नवीन पाइपलाइन व पाणीपुरवठा योजना स्वयंचलन 58 कोटी अशा भरीव विकास कामांच्या खर्चाचा समावेश आहे. पालिकेचा 2023- 24 चा एकूण संकीर्ण अर्थसंकल्प 466 कोटी 33 लाख 84 हजार 300 रुपये असून त्याला प्रशासकीय सभेत मंजुरी घेण्यात आली. हा अर्थसंकल्प जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मंजुरीसाठी पुढील आठवड्यात पाठवण्यात येणार आहे.