पारनेर – जिल्हा परिषदेच्या विविध योजनेतून झालेल्या कामांचे लोकार्पण करण्याचा सपाटा विखे पिता-पुत्राने लावला असून, स्वतःची कामे दाखवा, त्यांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करा, असा टोला आ. नीलेश लंके यांनी खा. डॉ. सुजय विखे यांना लगावला.
नगर तालुक्यातील वाकोडी फाट्याकडून वाकोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एमआयआरसीजवळील रस्त्यावर दोन कोटी रुपयांच्या पुलाचे भूमिपूजन, तसेच 90 लाख रुपयांच्या प्राथमिक उपकेंद्राच्या इमारत लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आ. दादा कळमकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे प्रवीण कोकाटे, प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख रोहिदास कर्डिले, प्रकाश पोटे, प्रियंका लामखडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी सचिन तोडमल यांनी वाकोडीचे विविध प्रश्न मांडले. त्यास भाऊसाहेब कराळे यांनी अनुमोदन दिले. आ. लंके म्हणाले की, दि. 24 नोव्हेंबरला वाकोडी- वाळुंज रस्त्याच्या कामाला मंजुरी मी आणली. परंतु गेल्या आठवड्यात खा. विखे यांनी लोकांची दिशाभूल करत हे काम आपणच केल्याचे सांगत भूमिपूजन केले.इतरांच्या आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम बंद करा, असा टोला आ. नीलेश लंके यांनी खा. डॉ. सुजय विखे यांना लगावला.
कळमकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने महागाईकडे दुर्लक्ष करत फक्त महाआघाडीच्या काळात मंजुरी मिळालेल्या कामांना बजेट मंजूर होऊनही फक्त स्थगिती लावण्याचा कार्यक्रम सुरू केल्याचे सांगितले. या वेळी संदेश कार्ले, रोहिदास कर्डिले, प्रताप शेळके यांनी मनोगते व्यक्त केली.
लग्न एकाचे.. नाचतोय दुसराच!
जिल्हा परिषदेच्या विविध योजनांतून केलेल्या कामांचे आता लोकार्पण करून आम्ही ही कामे केल्याचा आव आणत आहेत. याचा निधी कोणाचा, कामे केली कोणी असे प्रश्न उपस्थित करत खा. डॉ. विखे व माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका करत प्रताप शेळके यांनी लगावत लग्न कोणाचं, अन् नाचत कोण, असे म्हणत टोला लगावला.