पुसेगाव (प्रतिनिधी) – आमची बांधिलकी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांशी असून, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आम्हाला भरभरुन साथ दिली आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला जाणार असून शहरी भागापाठोपाठ ग्रामीण भागात देखील प्रत्येक गावांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत, अशी हमी आमदार महेश शिंदे यांनी दिली.
कोरेगाव मतदारसंघातील कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
जिल्हा बॅंकेचे संचालक सुनील खत्री, ज्येष्ठ नेते विजयराव घोरपडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. अभय तावरे, राहुल कदम, खटाव पंचायत समितीचे माजी सदस्य रणधीरशेठ जाधव, बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य भरत मुळे, संतोषआबा जाधव, संजय काटकर यांच्यासह तिन्ही तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले, “विरोधकांनी खोक्यांवर चर्चा सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला प्रेमाचे खोके दिले आहे, आम्ही ते जनतेस देणार आहोत.” तुमच्याकडे असलेले जरंडेश्वर कारखान्याचे आणि मुंबई बाजार समितीचे खोके कोठे आहे, तुम्ही जनतेसाठी कधी खोके बाहेर काढणार आहात, असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले, “कुमठे ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांनी खोक्यांचा आरोप केला, आम्ही शांत राहिलो. मात्र, शांत राहिल्यावर काय होते हे आता मतदारसंघालाच नव्हे तर जिल्ह्याला कळून चुकले आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या संविधानाचा विरोधकांनी अवमान केला. डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षि शाहू यांचे नाव घेण्याचा विरोधकांना अजिबात अधिकार नाही. आम्ही संविधानाचा आदर करतो, म्हणूनच ग्रामस्थांनी आमच्या सरपंचपदाच्या उमेदवाराला विजयी केले.”
कुमठे गावात शांत व संयमी नेतृत्व असून आता कुमठ्याचा कसा कायापालट करतो, तेच बघा, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी सुनील खत्री, प्राचार्य अनिल बोधे, रणधीर जाधव, प्रदीप फाळके, रत्नदीप फाळके, तानाजी जाधव यांच्यासह प्रमुख नेतेमंडळींची भाषणे झाली. प्रदीप कदम यांनी आभार मानले. यावेळी नूतन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पॅनेलप्रमुखांचा आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमस्थळी आमदार महेश शिंदे यांना घोड्यावर बसवून कार्यकर्त्यांनी जल्लोषात मिरवणूक काढली.
“…तर परिणाम भोगायला तयार राहा’
अनेक गावांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडी करुन लढलो, काही ठिकाणी गावांचा सन्मान ठेवला, आम्ही दोन पावले मागे सरलो, म्हणजे माघार नाही, असे स्पष्ट करुन आमदार महेश शिंदे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. भविष्यकाळात आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्रास दिला तर त्याचे काय परिणाम होतात, हे कुमठ्यातील घटनेवरुन लक्षात येईलच. पोलीस आता त्यांचे काम करत आहेत. एकूणच सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी हा आमदार महेश शिंदे ठामपणे उभा आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
युवाशक्तीच विजयाची शिलेदार
आमदार महेश शिंदे सरळ, साधा व सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आमदार बनला आहे. तो देखील सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवरच. आज ग्रामपंचायत निवडणुकीत विजयश्री संपादन केली आहे, ती देखील याच सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवरच, असे स्पष्ट करुन आमदार महेश शिंदे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत युवाशक्तीच विजयाची शिलेदार असल्याचे जाहीर करताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजर केला. मालगाव, आरळे, क्षेत्रमाहुली व देगाव या गावांचे उदाहरण देत असताना त्यांनी सेनापती नव्हता. मात्र, सेनापतीला विजयश्री मिळवून देत कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली असल्याचे सांगितले.
दृष्टीक्षेपात विजयश्री खेचून आणलेल्या ग्रामपंचायती
कोरेगाव तालुक्यात कुमठे, गोळेवाडी, सुलतानवाडी, पिंपोडे खुर्द, बनवडी, खामकरवाडी, अनुभलेवाडी, रुई, शेल्टी, खिरखिंडी, हिवरे, खडखडवाडी, बर्गेवाडी, जळगाव, खेड (नांदगिरी), वाघजाईवाडी, शिरंबे व आसगाव या ग्रामपंचायतींचे सरपंचपद पटकावले आहे. एकंबे येथे उपसरपंच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर 74 लाख 18 हजार रुपयांची देणगी
सातारा तालुक्यात क्षेत्रमाहुली, देगाव, आरळे, बोरखळ, मर्ढे, जैतापूर, आरफळ, म्हसवे, मालगाव, न्हाळेवाडी याठिकाणचे सरपंचपद पटकावले आहे. खावली व आसगाव येथे उपसरपंच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबरोबर आघाडी करुन वडूथमध्ये यश मिळवले आहे. खटाव तालुक्यात शिंदेवाडी व नागनाथवाडी या ग्रामपंचायतींचे सरपंचपद पटकावले आहे. ललगुण येथे उपसरपंच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.