पुसेगाव – महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविक-भक्तांनी एकाच दिवसात 74 लाख 18 हजार 485 रूपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर अर्पण के ली. सेवागिरी रथोत्सव सोहळा उत्साहात झाला या सोहळ्यातील मिरवणुकी दरम्यान रथावर अमेरिका, इंग्लंड, नेपाळसह विविध देशातील परदेशी चलनांच्या नोटाही अर्पण केल्या असून या रकमेत तुलनेने 20 रूपयांच्या नोटांची संख्या अधिक होती. तर 1 रुपयांच्या नोटाही भाविकांनी मनोभावे अर्पण केल्या आहेत. यात्रा कालावधी 27 डिसेंबरपर्यंत असली तरी संक्रातीपर्यंत यात्रा सुरूच राहणार असल्याने अर्पण केलेल्या देणगी रकमेत वाढ होणार आहे.
श्री सेवागिरी महाराजांच्या भाविक, भक्तांच्या संख्येत दरवर्षी लाखोच्या संख्येने वाढ होत आहे. बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक मोठ्या श्रध्देने महाराजांच्या रथावर रोख रक्कम स्वरूपात देणगी अर्पण करतात. यावर्षी देखील लाखो भाविकांनी हजेरी लावून श्रींच्या रथावर 10,20, 50, 100, 500 तसेच 2000 रूपयांच्या नोटांच्या माळा श्रध्देने अर्पण केल्या आहेत. रथोत्सवा दिवशी पहाटेपासूनच भाविकांची संख्या वाढत होती. रथपूजनासाठी मंदि रथावर भाविकांनी नोटाच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. सकाळी 11 वाजल्यापासून गर्दीत प्रचंड वाढ होऊन बघता बघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाळून गेला.
नोटांनी शृंगारलेला महाराजांचा रथ भाविक भक्तीभावाने डोळ्यात साठवत होते. परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस गुरुवारी सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला आणि रात्री 11 .30 वाजता मिवणूक संपवून रथ माघारी मंदिरात पोहचला. श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिरासमोर नोटांनी शृंगारलेल्या रथावरुन नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्तात ही सर्व रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली.मठाधिपती परम पूज्य श्री सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली.
रात्री बारा वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले. बॅंक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बॅंक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, न्यु सातारा समुह, यशवंत ग्रामीण पतसंस्था, कराड अर्बन बॅंक, मायणी अर्बन बॅंक, ज्ञानदीप को-ऑप बॅंक, सेवागिरी सहकारी पतसंस्था, सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था, शिवकृपा, कराड मर्चट पतसंस्था व विविध बॅंका, पतसंस्था व वित्तसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व स्वंयसेवकांनी देणगी मोजण्याचे काम पाहिले. यावेळी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.
सेवागिरींचा लौकिक सातासमुद्रापार
श्री सेवागिरी महाराजांचा लौकीक दिवसेंदिवस वाढत चालला असून सातासमुद्रापार महाराजांची किर्ती पसरत आहे. यावर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावरील देणगी रक्कमेत भारतीय चलनाबरोबरच इतर देशातील चलनी नोटा भक्तांनी रथावर अर्पण केल्या. यामध्ये युनायटेड अरब अमिरातीच्या धीरमच्या नोटा, कतारचा रियाल, युरो नोटा, इंग्लंडचे पौंड, यु.एस. डॉलरच्या नोटा, दुबईच्या चलनी नोटांचा समावेश आहे.