यशोधन अनाथालयातील पुरुषोत्तम जाधव यांच्या व्हिडीओ क्लिपमुळे पटली ओळख
खंडाळा – गेल्या महिन्यात पुरुषोत्तम जाधव यांनी आपला वाढदिवस यशोधन अनाथालय वेळे येथील मनोरुग्णांसमवेत साजरा केला, या कार्यक्रमाची व्हिडिओ प्रसार माध्यमांवर जवळपास सात लाख लोकांनी पहिली. मात्र, यामुळे एका मनोरुग्ण युवकाची ओळख पटल्याने जवळपास चार वर्षापासून बेपत्ता असलेल्या मुलाची व आईची भेट घडली.
सलमान उर्फ शरीफ खान (वय १७ रा. हडपसर जि. पुणे) हा गेल्या चार वर्षापूर्वी वारीमधून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होती. मनोरुग्ण असल्याने त्याला बोलता येत नसल्याने तो जवळपास २ वर्ष भटकत राहिला. दोन वर्षांपूर्वी यशोधन अनाथालयाचे सर्वेसर्वा रवी बोडके यांनी सलमानला आपल्या संस्थेत आधार देऊन त्याच्यावर औषधोपचार करत त्याचा सांभाळ केला.
मात्र, वाढदिवसाच्या व्हिडिओद्वारे सलमानची ओळख पटली व हडपसर पोलीस ठाण्यातून जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांना फोन आला. जाधव यांनी सलमानच्या कुटुंबीयांशी संपर्क करत त्यांना वेळे येथील यशोधन अनाथालयात घेऊन गेले. यावेळी तब्बल चार वर्षानंतर माया-लेकराची भेट घडून आल्याचा अतिशय भावनिक क्षण पाहून उपस्थितही गहिवरले.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, वाढदिवसाच्या कार्यक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यासाठी कार्यक्रम घेतला व त्याद्वारे या माया-लेकराची भेट घडली. त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचे आनंदाश्रू हे आजपर्यंतचे मला माझ्या वाढदिवसासाठी मिळालेले हे सर्वात मोठी व अमूल्य भेट आहे. सोशल मीडियाचा वापर सामाजिक कामासाठी केलात तर त्याचा परिणामही सकारात्मक मिळतो याचे जिवंत उदाहरण अनुभवले.
रस्त्यावर फिरताना कोणीही निराधार व्यक्ति आढळल्यास त्यांना यशोधनमध्ये सामील करून त्यांच्यावर उपचार व राहण्याची सोय केली जाते, अशा निराधार मनोरुग्णाची ओळख पटल्याने त्यांना त्यांचे कुटुंबीय मिळतात, तो क्षण जगातील सर्वात जास्त आनंददायी क्षण असतो.
– रवी बोडके, यशोधन ट्रस्ट