अकलूज – फलटण तालुक्यातील पिंप्रद गावाजवळील ऊसाच्या फडात घडलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणात माळशिरसचे दोन डॉक्टरांचा सहभाग निष्पन्न झाले असल्याने त्या प्रकरणाचे थेट कनेक्शन माळशिरसपर्यंत पोहचले आहे. फलटण येथील पिंप्रद गावाजवळील एका उसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याचे ‘ स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आल्यानंतर गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर, तसेच चाचणीनंतर गर्भवती महिलेचा गर्भपात करणार्या डॉक्टरचे नाव वाई पोलिसांच्या तपासांत निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे कनेक्शन समोर आले असून त्या प्रकरणाशी संबंधित एका डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. उसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याच्या माहितीवरुन स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर पोलिसांनी फडात गर्भलिंग निदान चाचणीसाठी गेलेल्या महिलेसह तिचा नातेवाईक आणि एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता.
वाई पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक फौजदार विजय शिर्के यांनी तसेच त्यांच्या पथकाने गेल्या महिनाभरापासून या प्रकरणाचा तपास केला. त्यामध्ये माळशिरसचे कनेक्शन समोर आले. फलटणच्या उसाच्या फडात गर्भलिंग निदान चाचणी केल्यानंतर संबंधित गर्भवती महिलेने माळशिरस येथे जाऊन एका डॉक्टरांकडे गर्भपात केल्याचे तपासात समोर आले.
त्यानंतर वाई पोलिसांचे एक पथक संबंधित डॉक्टरला अटक करण्यासाठी माळशिरसला गेले; मात्र गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संबंधित डॉक्टर पसार झाले, तर दुसरीकडे फलटण येथील उसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डॉक्टरही पसार झाले आहेत. पोलिसांनी अटक करू नये म्हणून माळशिरसमधील संबंधित डॉक्टरांनी वाई न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून, या अर्जावर सोमवारी (दि. 5) सुनावणी होणार आहे.
समाजातून तिखट प्रतिक्रिया
गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा कडक असूनही समाजामधील काही व्हाइट कॉलर नराधम गर्भलिंग निदान आणि गर्भपातासारखे माणुसकीला काळीमा फासणारे गुन्हे करत आहेत. बीड जिल्ह्यातही गेल्या महिन्यात घरात गर्भपात करत असताना पोलिसांनी कारवाई केली होती. पण तो डॉक्टर पसार झाला होता. फलटण प्रकरणाही तसेच आहे. यातील दोषी डॉक्टरांना कठोर शासन करावे. जेणेकरुन भविष्यात असा गुन्हे करण्यस कोण धजावणार नाही अशा तिखट प्रतिक्रीया समाजातून उमटत आहेत.