कोरेगाव – राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या ल्हासुर्णे गावाचा चेहरामोहरा आ. महेश शिंदे यांनी अल्पावधीत बदलला आहे. या गावासाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून दिला असून त्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खटाव येथील निवासस्थानी भेट घेऊन आमदार महेश शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला.
कोरेगाव तालुक्याच्या राजकीय वाटचालीमध्ये ल्हासुर्णे गावाला महत्व आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कोरेगावातून आमदार झालेल्या शशिकांत शिंदे यांनी येथे निवासस्थान बांधले आणि ल्हासुर्णेकर ग्रामस्थ म्हणून सर्वत्र हजेरी लावू लागले. मात्र त्यांनी ल्हासुर्णे गावाला अपेक्षित साथ दिली नाही. विकासकामे केली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ त्यांच्या नेतृत्वावर नाराज होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ल्हासुर्णे गावाने आ. महेश शिंदे यांना मतदान केले व विजयी करण्यात हातभार लावला होता.
आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी सरपंच किसनराव सावंत, प्रशांत संकपाळ, पोपटराव सावंत विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब मचिंदर प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गावाने विकासाची वाट धरली. आ. महेश शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे मंजूर करत कोट्यावधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे ग्रामस्थ समाधानी आहेत.
सोमवारी विकास सोसायटीचे संचालक सोमनाथ सावंत, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ माने, ज्येष्ठ ग्रामस्थ हणमंतराव घाडगे, संजय घाडगे, प्रकाशराव घाडगे, शंकरराव घाडगे, रवींद्र घाडगे, संदीप माने, राजेंद्र घाडगे यांनी आमदार महेश शिंदे यांची भेट घेऊन आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी सरपंच किसनराव सावंत, प्रशांत संकपाळ, पोपटराव सावंत, विद्यमान सरपंच संतोष चव्हाण, विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब मचिंदर, प्रदीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संपतराव सावंत, सुहास बर्गे, तुकाराम सावंत, कपिल चव्हाण, धनाजी सावंत, सचिन सावंत, हरिश्चंद्र सावंत, विकास सोसायटीचे संचालक सोमनाथ सावंत, संतोष सावंत, राहुल सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ल्हासुर्णे गावाची हायटेक वाटचाल
आमदार महेश शिंदे यांनी जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल योजनेसाठी एक कोटी १७ लाख रुपयांचा निधी दिला असून ती योजना पूर्णत्वाकडे गेली आहे. जिल्हा नियोजन समितीतून साकव पुलासाठी ५६ लाख रुपये निधी दिला असून हा पूल बांधून पूर्ण झाला आहे. ल्हासुर्णे – कुमठे रस्त्यासाठी चार कोटी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर गावात अंतर्गत काँक्रीट रस्ते व बंदिस्त गटारे करण्यात आली असून त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारली जात असून त्यासाठी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जलसंधारण विभाग अंतर्गत एक कोटी रुपयांचे दोन बंधारे मंजूर करण्यात आले आहेत.