कोयनानगर(विजय लाड प्रतिनिधी) :- पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने कोयना परिसर पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असून धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना निधी मिळाला असून पर्यटन विकासाला गती मिळणार आहे.
थंड हवेचे नवे ठिकाण व वीकेंड डेस्टिनेशन म्हणून लवकरच उदयास येणाऱ्या कोयना परिसरात साकारत असलेला नवीन महाबळेश्वर व सहयाद्री व्याघ्रप्रकल्प परस्परपूरक आहेत. हे प्रकल्प कोयना परिसरात उभे राहत असल्याने कोयना पर्यटनाचा लूक बदलण्यास मदत होणार आहे. या दोन प्रकल्पांबरोबर राज्य शासनाने कोयना परिसरातील प्रसिध्द असणाऱ्या धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणांच्या सुशोभिकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी देत आघाडी घेतली आहे. लवकरच याठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्राचेही काम चालू होणार असल्याने पर्यटनाचे माहेरघर असणारे कोयनानगर जागतिक पर्यटनाचे हब म्हणून उदयास येणार आहे.
* कोयना पर्यटन विकासाला राज्य शासनाचे प्राधान्य
* धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी भरीव निधी
* कोयना पर्यटनाचे हब म्हणून नावारूपाला येणार
निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला कोयना परिसर पृथ्वीवरील स्वर्ग आहे. उंचच उंच पर्वतरांगा, खळाळत वाहणारी कोयना नदी आणि हिरवीगार वनराई यामुळे पश्चिम घाटाचे क्षेत्र हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून या परिसराचा पर्यावरणपूरक विकास होत आहे. राज्य शासनाने या ठिकाणाला प्रादेशिक पर्यटन केंद्राचा दर्जा दिल्यामुळे शासनाकडून निधीची बरसात होत आहे.
अल्पावधीत वीकेंड डेस्टिनेशन बनलेल्या या परिसराला निसर्ग पर्यटनाचा वारसा आहे. याठिकाणची धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे दुर्लक्षित होती. परंतु, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून रासाटी येथील नवलाई मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ३० लाख रुपये, बोपोली येथील पांडवकालीन अंबा खेळती मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख, तर कोयना नदी तीरावरील घाटास दगडी पायऱ्या बसविण्यासाठी ७५ लाख रुपये निधी देण्यात आला आहे. पालकमंत्री देसाई यांच्या प्रयत्नातून कोयनानगर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणीलाही गतवर्षी मान्यता देण्यात आली असून त्याचे काम सुरू होत आहे. त्यामुळे एकंदरीतच कोयना पर्यटन बहरू लागले आहे.
पालकमंत्र्यांनी कोयना पर्यटनाला गती द्यावी
पालकमंत्री शंभूराज देसाई कोयनापुत्र असून कोयना परिसरातील दास्तान या गावात त्यांची वडीलोपार्जित जमीन आहे. दास्तानचा परिसर निसर्गरम्य आहे. याठिकाणी वॉटर पार्क अथवा आलिशान पर्यटन पूरक वास्तू उभारुन पालकमंत्री शंभूराज देसाई कोयना पर्यटनाला गती द्यावी. कोयना पर्यटन क्षेत्राचे रूपडे बदलण्यासाठी पालकमंत्र्यांनी कोयना पर्यटन आराखडा यांनी तयार केला आहे. या आराखड्यातील अनेक कामांची अंमलबजावणी होत असून कोयनेला अच्छे दिन येण्यास सुरवात झाली आहे.