दारुसाठी 50 फूट टॉवरवर चढला; पोलिसात गुन्हा नोंद
पाटण – कोयनानगर ता. पाटण येथील दास्तान गावाच्या शेजारील उच्चदाबाच्या वीजवाहिनी टाॅवरवर कोयनानगर येथील व्यसनमुक्ती केंद्रात दारू सोडण्यासाठी बेळगावातून आलेल्या व्यक्तीने ‘शोले स्टाईल’ जीवघेणे थरारनाट्य केले. दारूच्या नशेत तर्रर असणाऱ्या
करीप्पा तुकाराम कंटेकर याला पहाटे रेस्कु ऑपरेशन राबवून टॉवरवरून खाली सुरक्षित उतरवण्यात आले. दरम्यान ड्रामेबाज करीप्पावर कोयनानगर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार करीप्पा तुकाराम कंटेकर (रा. शंभरगई ता. अथणी जि. विजापूर) हा युवक दास्तान येथील व्यसनमुक्ती केंद्रात बुधवारी सायंकाळी दारू सोडण्यासाठी नातेवाईकांसह आला होता. मात्र, त्याला दारू सोडण्याची इच्छा नव्हती नातेवाइकांनी जबरदस्तीने कोयनानगरला आणलेल्या करीप्पा सायंकाळी सहा वाजता गाडीवरून धूम ठोकत शेतात सैरावैरा पळू लागला.
शेवटी दारुसाठी त्याने महापारेषणच्या सुमारे पन्नास फूट उंचीच्या टॉवरवर जाऊन शोले स्टाईल थरारनाट्य केले. त्याच्यासोबत आलेल्या नातेवाकांनी त्याची समजूत काढून टॉवरवरून खाली उतरण्यासाठी विनंती केली. मात्र, करीप्पा आणखी वर वर चढू लागला. तो नातेवाकांनाही जुमानत नसल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत करीप्पाला टॉवरवरून खाली उतरण्यासाठी विनंती केली. मात्र, दारुसाठी बेभान करीप्पाने जोपर्यंत दारू मिळत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेतला.
अखेर याची माहिती महापारेशनचे अधिकारी, पाटणचे तहसीलदार, प्रांताधिकारी यांना देण्यात आली. टॉवरवरून खाली उतरत नसल्याने हाय व्होल्टेज लाइन असल्यामुळे प्रशासनाची चिंता हळूहळू वाढत होती. महापारेषणचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महापारेषण अधिकारी टॉवरवर चढल्याचे त्याच्या लक्षात येताच तो आणखी वरवर जाऊ लागला.
अखेर तो पन्नास फूट 440 किलो वॅट विद्युत वहिनी जवळ पोहोचला. त्यानंतर रात्री काही काळ महापारेषण ची विद्युत लाईन बंद करण्यात आली. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, करीप्पाला सुरक्षित टॉवरवरून खाली उतरविण्यास त्यांनाही अपयश आले.
अखेर पहाटे साडेचार वाजता सातारा येथील शिवेंद्रराजे ग्रुपच्या रेस्क्यू टीमला कोयनानगर येथे पाचारण करण्यात आले. त्यांनी करीप्पाला सुरक्षित टॉवरवरून खाली उतरवले. सायंकाळी 6 वाजता टॉवरवर चढलेल्या करीप्पाचे रेस्कु ऑपरेशन पहाटे साडेचार वाजता संपले. करीप्पाला सुरक्षित टॉवरवरून खाली उतरण्यास प्रशासनाला यश आले.
कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी करत आहेत.यावेळी तहसीलदार योगेश्वर टोम्पे, प्रांताधिकारी रणजीत पाटील, पाटण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्यासह अग्निशामक दलाचे जवान महापारेषण चे अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
महापारेषनचे 70 लाखाचे नुकसान
कोयनानगर येथील व्यसनमुक्ती केंद्र दारू सोडण्यासाठी आलेल्या करीप्पाच्या शोले स्टाइलचा झटका महावितरणला झाला आहे. तब्बल दहा तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे महापारेषण पुणे मुंबईला जाणारा वीजपुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला. मात्र या खंडित पुरवठ्यामुळे महापारेषणचे तब्बल 70 लाखाचे नुकसान झाले आहे.
बेळगाव येथील करिप्पा तुकाराम कंटेकर कोयनानगर येथील व्यसनमुक्ती केंद्र दारू सोडण्यासाठी आला होता. मात्र, त्याला दारू सोडायची इच्छा नव्हती. तो टॉवरवर चढला. पहाटे साडेचार वाजता रेस्क्यू ऑपरेशन राबवत त्याला सुरक्षित खाली उतरवण्यात आले व आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचा जीव वाचविण्यास आम्ही यशस्वी झालो याचाही आनंद आहे.
चंद्रकांत माळी,(सहाय्यक पोलीस निरीक्षक, कोयनानगर)