बॉलीवूड अभिनेता सनी देओल आणि अमिताभ बच्चन या दोन्ही कलाकारांचे चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे. या दोघांनी “इंसानियत’ चित्रपटात एकत्रित काम केले होते. यात अमिताभ बच्चन यांनी एक छोटीशी भूमिका साकारली होती. यानंतर सनी आणि अमिताभ हे पुन्हा एकदा एकत्रित झळकणार आहेत.
चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आर. बाल्की यांनी काही दिवसांपूर्वीच एका थ्रिलर चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात सनी देओल, पूजा भट्टी आणि दुलकर सलमान मुख्य भूमिका साकारणार आहेत. बाल्की म्हणाले की, या चित्रपटात सनी देओलला अशी भूमिका देण्यात आली आहे, जी की त्याने आतापर्यतच्या आपल्या कारकिर्दीत अशी भूमिका साकारलेली नाही.
या चित्रपटातील सनीचा अंदाज हा चाहत्यांना आश्चर्यचकीत करणारा असाच असणार आहे. या चित्रपटात बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचीही एंन्ट्री झाली आहे. बाल्की यांनी अमिताभसोबत आतापर्यंत अनेक चित्रपट केले असून दोघांमध्ये चांगले संबंध आहे.
याबाबत बाल्की म्हणाले की, अमिताभदेखील या चित्रपटात झळकणार आहे. भलेही त्यांची भूमिका छोटीशी असेल. दरम्यान, अमिताभ बच्चन आणि सनी देओल यांना एकत्रित पाहण्यासाठी चाहत्यांमधील उत्सुकता वाढली असून त्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.