सातारा – सातारा शहर मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात दागिने चोरणार्या रूपाली अर्जुन सकट आणि गीता संदीप भोसले (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) यांना आणि त्यांच्याकडून चोरीचे दागिने विकत घेणार्या रफीक अजीज शेख (रा. सांगली) या सोनाराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 32 लाख सहा हजार 700 रुपये किमतीचे 50 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या टोळीतील अन्य सदस्यांचा शोध सुरू आहे.
याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सातारा मध्यवर्ती बसस्थानकात एक प्रवासी 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता बसमध्ये चढत असताना, चोरट्यांनी त्याच्या बॅगेतील तीन लाख दहा हजार रुपये किमतीचे सव्वासात तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेला डबा चोरून नेला होता. हा गुन्हा गांभीर्याने घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील पथक साध्या वेशामध्ये बसस्थानक परिसरात पाळत ठेवून होते. विशेषतः संशयास्पद हालचाली करणार्या महिलांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते.
त्यावेळी रूपाली सकट व गीता भोसले यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यात या महिलांनी सातारा, वडूज, फलटण, कराड, दहिवडी, कोरेगाव येथील बसस्थानकांमध्ये प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. हे दागिने सांगली येथील सोनारास विकल्याची माहिती दोघींनी दिल्यानंतर रफीक शेख यालाही अटक करण्यात आली. या टोळीत आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. विश्वसनीय बातमीदाराकडून माहिती घेऊन आणि तांत्रिक विश्लेषणातून इतर संशयितांची माहिती घेण्यात येत आहे. ही टोळी बसस्थानक परिसरातील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व साहित्य चोरत होती.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर पाटील, रवींद्र बोरे, रोहित पारणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संपाळ, आतिश गाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडिक, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, मोहन नाचण, अजित करणे, हसन तडवी, मुनीर मुल्ला, सनी आवटे, राकेश खांडके, शिवाजी भिसे, मनोज जाधव, राजू कांबळे, प्रवीण कांबळे, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, धीरज महाडिक, मोहसीन मोमीन, दीपाली यादव, सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आरती भागडे, दीपाली गुरव, पंकजा जाधव, पंकज बेचके, अमृत करपे, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम, सायबर विभागाचे अमित झेंडे यांनी ही कारवाई केली.