पुसेगाव -खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते व सदस्या सुनीता कचरे यांच्या माध्यमातून खटाव व पुसेगाव गटातील सात नवीन शाळा खोल्यांसाठी 62 लाख 72 हजार आणि शाळा दुरुस्तीसाठी सात लाख 50 हजार रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केल्याची माहिती पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे यांनी दिली.
स्पर्धा परीक्षा व गुणवत्तेची चांगली परंपरा खटाव तालुक्याला आहे. सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाकडून उपक्रम राबविले जात असल्याने, तालुक्यातील विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत. तालुक्यात अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती ब्रिटिशकालीन किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील आहेत.
या इमारतींची दुरवस्था झाल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. पटसंख्या वाढलेल्या गावांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून जिल्हा नियोजन समितीतून नवीन शाळा खोल्यांसाठी निधी देण्याची मागणी खटाव व पुसेगाव जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांनी केली होती.
त्यानुसार खा. पाटील, आ. शशिकांत शिंदे, प्रदीप विधाते, सुनीता कचरे यांनी प्रयत्न करून खटाव गटातील विसापूर, कटगुण, जांब, दरजाई, पुसेगाव गटातील बुध येथे प्रत्येकी एक व चिंचणी शाळेत दोन खोल्यांसाठी 62 लाख 72 हजारांचा, तर आवारवाडी शाळा दुरुस्तीसाठी अडीच लाख, जाखणगाव शाळा दुरुस्तीसाठी तीन लाख व मोळ शाळा दुरुस्तीसाठी दोन लाखांचा निधी मंजूर केला आहे. संतोष साळुंखे म्हणाले, शंभर टक्के शाळा डिजिटल व भौतिक सुविधांनी युक्त आहेत.